विशेष प्रतिनिधी
पुणे : MP Sports Festival : भारतातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांचा एक भाग म्हणून पुण्यात नोव्हेंबर 2025 मध्ये ‘पुणे सांसद खेळ महोत्सव’ आयोजित होणार आहे. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करत पुण्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी या स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले.भारत सरकार क्रीडा संस्कृतीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सांसद खेळ महोत्सव’ सुरू करण्याची घोषणा केली होती. याच उपक्रमाचा भाग म्हणून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये पुण्यात ‘सांसद खेळ महोत्सव’ आयोजित करण्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचा संकल्प
पत्रकार परिषदेत बोलताना खासदार मोहोळ म्हणाले, “पंतप्रधानांच्या ‘फिट इंडिया’ मोहिमेला क्रीडा क्षेत्राची जोड देताना पुण्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जात आहे. पुणे हे क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. येथून अनेक नावाजलेले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.”
33 क्रीडा प्रकार, 25,000 खेळाडूंचा सहभाग
या खेळ महोत्सवात 33 विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. पुण्याच्या विविध भागांमध्ये या स्पर्धा आयोजित केल्या जाणार असून, जिल्ह्यातील सुमारे 25,000 खेळाडू यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. “हा महोत्सव स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आयोजित केला जात आहे. विविध वयोगटांतील खेळाडूंसाठी ही स्पर्धा जिल्हास्तरावर खेळवली जाईल. यातून निवडलेल्या गुणवंत खेळाडूंना क्रीडा मंत्रालयाशी जोडण्याचा आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
कुठे होणार स्पर्धा?
या महोत्सवासाठी पुण्यातील उपलब्ध मैदाने आणि नव्याने विकसित केली जाणारी क्रीडा मैदाने यांचा वापर केला जाणार आहे. खडकी, पुणे छावणी, पर्वती ते बालेवाडी यासह संपूर्ण पुणे शहरात या स्पर्धांचे आयोजन होईल. विशेषतः बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीतील मैदाने आणि शहरातील इतर क्रीडा सुविधांचा यात समावेश असेल. येत्या दीड महिन्यांत काही नवीन मैदानेही तयार केली जाणार असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.
पुण्याच्या क्रीडा संस्कृतीला नवी उभारी
या सांसद खेळ महोत्सवामुळे पुण्याच्या क्रीडा संस्कृतीला एक नवीन आयाम मिळणार आहे. स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन, क्रीडा क्षेत्रातील नव्या संधी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागाची तयारी यामुळे पुणे शहर क्रीडा क्षेत्रात आणखी प्रगती करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पुणे सांसद खेळ महोत्सव हा केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून, खेळाडूंना प्रोत्साहन देणारा आणि पुण्याच्या क्रीडा वारशाला बळकटी देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. यामुळे शहरातील क्रीडा संस्कृती अधिक समृद्ध होईल आणि नव्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.
New direction for athletes in Pune: MP Sports Festival in November!
महत्वाच्या बातम्या