• Download App
    NCP' राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे शिंतोडे आधी काँग्रेसवर; आता गुंडगिरी आणि हुंडाबळीचे शिंतोडे भाजपवर!!

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे शिंतोडे आधी काँग्रेसवर; आता गुंडगिरी आणि हुंडाबळीचे शिंतोडे भाजपवर!!

    शरद पवारांनी स्थापन केलेल्या आणि “संस्कारित” केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीचे उपद्रवमूल्य आधी काँग्रेसला भोगावे लागले आणि आता ते भाजपला भोगावे लागत आहे. 2014 पूर्वी राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे शिंतोडे त्यावेळच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारवर उडाले होते. त्याच वर्षी काँग्रेसला सत्ता गमवावी लागली होती. 2025 मध्ये त्याच राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचे आणि हुंडाबळीचे शिंतोडे भाजपवर उडत आहेत.

    फक्त फरक एवढाच आहे, की काँग्रेसला सत्ता चालवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीची संख्याबळाची गरज होती, म्हणून काँग्रेसने नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली होती, पण आता भाजपला संख्यात्मक बळासाठी बिलकुल गरज नसताना भाजपने स्वतःहून राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःच्या सत्तेच्या वळचणीला आणून ठेवले आणि राष्ट्रवादीच्या गुंडगिरी आणि हुंडाबळीचे शिंतोडे स्वतःवर उडवून घेतलेत.

    2014 पूर्वी सिंचन घोटाळा आणि सहकारी बँक घोटाळा यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आकंठ बुडाले होते. सिंचन घोटाळा 70 हजार कोटींचा आहे, तर सहकारी बँक घोटाळा‌450 कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले गेले होते. शरद पवारांनी 2012 – 13 मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी या नावाखाली सहकारी बँकांचा भरणा केला होता. अर्थातच बहुतांश सहकारी बँका या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वर्चस्वाखाली होत्या. राज्य सहकारी बँकेत जरी सर्वपक्षीय संचालक मंडळ असले तरी त्याच्यावर वर्चस्व मात्र शरद पवारांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. बँक घोटाळ्यातले सर्वाधिक लाभार्थी राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न होते. त्या वेळच्या वर्तमानपत्रांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये त्या संदर्भातल्या सविस्तर बातम्या झळकल्या होत्या. सिंचन घोटाळ्याच्या बातम्यांनी देखील माध्यमांचे रकाने आणि टीव्ही स्क्रीन भरून गेले होते.

    त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारा विरोधात पूर्ण महाराष्ट्रात रान पेटवले होते. राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीशी धर्म म्हणून नाही, आपद्धर्म म्हणून नाही, त्यांच्याशी आघाडी किंवा युती होणार नाही, असे ते जाहीर मुलाखतीत म्हणाले होते. पण त्यावेळी देवेंद्र फडणवीस चाळीशी मध्ये होते.

    आता मात्र तेच देवेंद्र फडणवीस 55 वर्षांचे असताना यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस नावाची प्रवृत्ती भाजपने स्वतःच्या सत्तेच्या वळचणीला आणून ठेवली. याचा अर्थ मधल्या काळात महाराष्ट्रातल्या बऱ्याच नद्यांमधून बरेच राजकीय पाणी वाहून गेले. फडणवीस यांच्यासारख्या नेत्याचे आणि त्यांच्या वरिष्ठांचे खूप मोठे “मतपरिवर्तन” झाले. 2024 च्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याकडे पुरेसे बहुमत असताना भाजपने स्वतःहून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेच्या वळचणीला आणून बसवले.

    अर्थात त्यामध्ये भाजपचे काय राजकीय हिशेब असायचे ते असोत, पण सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीच्या गुंडगिरीचे आणि हुंडाबळीचे शिंतोडे भाजपवर उडताना दिसत आहेत. बीडमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या गुंडगिरीने कळस गाठला. त्याची फक्त “छोटीशी” राजकीय किंमत धनंजय मुंडे यांना चुकवावी लागली. पण त्यापलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा डग लागलेला दिसत नाही. त्यावेळी सवाल मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर उपस्थित केले गेले.

    वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे पोलिसांवर दबाव आणला म्हणून तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबीयांना व्हीआयपी वागणूक मिळाली. हे प्रकरण खूप अंगाशी शेकतंय हे लक्षात आल्यानंतर अजित पवार “ऍक्टिव्ह” झाले. त्यांनी पोलिसांना आदेश दिले. त्यानंतर नराधम राजेंद्र हगवणेला अटक झाली. पण या सगळ्या प्रकरणातले शिंतोडे राष्ट्रवादी काँग्रेसवर जसे उडाले, तसेच ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्यावर देखील उडाले. पुणे पोलिसांमध्ये 6 अधिकारी संशयाच्या स्कॅनर खाली आले.

    – सगळेच गुन्हेगार राष्ट्रवादीचे कसे??

    महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या गुन्ह्यांमधले आरोपी आणि संशयित राष्ट्रवादी काँग्रेसशीच संबंधित कसे??, असा खोचक पण खरा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. त्याला अजित पवारांनी उत्तर दिले नाही कारण काँग्रेस आज दुबळी आहे. पण म्हणून सपकाळ यांचा सवाल खोटा ठरत नाही आणि त्याचे महत्त्व तर बिलकूल कमी होत नाही.

    NCP’s corruption, hooliganism and dowry politics first troubled Congress and now in BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chandrashekhar Bawankule : ‘देशाला नाही समजू शकले, परराष्ट्र धोरण काय समजेल’

    लग्न नाही झाले, तरी संसार एकत्र करू लागले, पवार काका – पुतण्याच्या ऐक्याची प्रकाश आंबेडकरांकडून पोलखोल!!

    Harshvardhan Sapkal’ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल; सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातले कसे?