प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेला “व्हाय आय किल्ड गांधी” हा सिनेमा जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका साकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या सिनेमाचा प्रोमो आज प्रदर्शित झाला आहे. NCP MP Dr. Roles of Amol Kolhe Nathuram Godse
एक कलाकार म्हणून नथुरामची भूमिका आव्हानात्मक वाटली म्हणून मी ती भूमिका केली आहे. मी नथुरामच्या राजकीय भूमिकेचे कधीच समर्थन केलेले नाही. शिवाय 2017 या सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे. त्यावेळी मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नव्हतो. राष्ट्रवादीचा खासदारही नव्हतो, असा खुलासा डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.
यावरून अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने या संदर्भात नेमकी भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणी केली आहे, तर मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचे समर्थन केले आहे.
अमोल कोल्हे यांनी कलावंत म्हणून जी भूमिका केली आहे. सिनेमातली गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्ष जीवनातली गोष्ट वेगळी त्याची गल्लत करू नये, असे असलम शेख म्हणाले आहेत. मात्र यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. काँग्रेसचे दुसरे नेते हुसेन दलवाई यांनी डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करणे टाळायला हवे होते, असे मत व्यक्त केले आहे.