विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘कोणी बापाचा पक्ष चोरलाय तर कोणी काकाचा पक्ष चोरलाय’, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. राऊतांच्या या टीकेला अजित गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांचे 3 इंद्रिये निकामी झाले आहेत. मेंदू, जीभ आणि डोळे हे ते इंद्रिय आहेत, अशी जहरी टीका अमोल मिटकरी यांनी केली.
महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा अकोला येथे पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी राऊतांचा समाचार घेतला. यावेळी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते.
राऊतांनी मोतीबिंदूंचे ऑपरेशन करावे
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 44 आमदार 4 खासदार आणि अख्खा पक्ष अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे संजय राऊतांनी डोळ्याला झालेल्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे. अजित पवार संजय राऊतांना उत्तर देणार नाहीत. आम्ही कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहोत.
अजित दादाच NCPचे राष्ट्रीय अध्यक्ष
महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष’ असा उल्लेख केला आहे. पुलोदचे सरकार स्थापन झाले तेव्हा जनसंघाचे लोकही सोबत होते. असा प्रयोग अजित पवार यांनी केला तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा अजित पवार ढाल बनून पुढे गेले. जे पोटात आहे ते त्यांच्या ओठात आहेत, असेही मिटकरी म्हणाले.
मुख्यमंत्री असताना ठाकरे दोनदाच मंत्रालयात आले
मिटकरी म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना मंत्रालयात सातत्याने काम करणारे केवळ अजित पवारच होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनदाच मंत्रालयात आले होते. कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता अजित पवार मंत्रालयात काम करत होते. देशात तरुणांना आकर्षित करत असेल आणि आपले राज्य विकासाच्या मार्गाने नेईल, असे कोणते नेतृत्व असेल तर ते पीएम मोदींचे नेतृत्व आहे, असे अजित पवार म्हणाले होते. आमचा नेता जे सांगेन तेच धोरण आणि आमचा नेता जो बांधेन तेच तोरण हीच आमची भूमिका आहे, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.
NCP MLA Amol Mitkari Criticizes Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- हायकोर्टाने केले स्पष्ट, जरांगेंना रोखणार नाही, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची
- डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढून 5.69% वर; खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे वाढ
- अयोध्येच्या सोहळ्यात 11 कुटुंबांना पूजेचा मान; त्यामध्ये तुळजापूरच्या महादेव गायकवाडांचा सहभाग!!
- राम मंदिराच्या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी नियतीने मोदींना निवडले… राम मंदिर आंदोलनाचे मूळ शिलेदार अडवाणींच्या भावना