राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे औरंगाबादेत येऊन गेल्या. त्यांनी राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत अनेकांनी तक्रारी – गाऱ्हाणी मांडून घेतली. पण खुद्द सुप्रिया सुळे यांनी जे उद्गार काढले, जे सत्य त्या बोलून गेल्या त्याने मात्र महाराष्ट्राचे डोळे विस्फारले…!! NCP leader MP Supriya Sule in Aurangabad
सुप्रियाताईंनी जणू नवा उखाणाच महाराष्ट्राला बहाल केला…, चांदीच्या ताटात सत्तेचे तुकडे, कार्यकर्त्यांना खाता येईना त्यांचे तोंड….!! गाळलेल्या जागेवरचा “हा शब्द” ज्याचा त्याने ठरवून वापरायचा आहे…!!
पण सुप्रियाताई खरंच या निमित्ताने खरे बोलून गेल्या… समोर चांदीचे ताट ठेवले आहे. त्यात चांगले खायला वाढले आहे. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ते खाता येत नाही. एवढे मोठे राष्ट्रवादी भवन हडकोत बांधले आहे, पण तेथे कोणीही कार्यकर्ते, नेते फिरकत नाहीत. जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय लांब आहेत, असे म्हणतात. पण बिर्याणी खायला मात्र 20 – 20 किलोमीटर लांब जातात, अशा शब्दात त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना ठणकावले आहे…!! आता सगळ्यांना वाटले असेल की खुद्द सुप्रियाताईंनी ठणकावले म्हटल्यानंतर राष्ट्रवादीची सभा सुन्न झाली असेल…!! पण नाही…!!
सुप्रियाताईंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ज्या बैठकीत सत्य सुनावले, त्याच बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंना कटुसत्य सुनावले…!! आम्हाला ना चांदीचे ताट दिसते, ना त्यातले अन्न… राष्ट्रवादीच्या काहीच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना चांदीच्या ताटाचा लाभ झाला आहे. बाकीचे तसेच उपाशी आहेत, असे कार्यकर्त्यांनी त्या बैठकीत सुनावले. सुप्रियाताईंनी सुनावले ते सत्य होते, पण कार्यकर्त्यांनी सुनावले ते कटूसत्य होते…!!
सुप्रियाताई जे बोलल्या ते सत्यच होते. खरंच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला जेवायला चांदीचे ताट मिळाले आहे. जनमताचा कौल भाजपा-शिवसेना महायुतीला असताना शिवसेनेला भाजपपासून फोडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना चांदीच्या ताटात सत्तेचे तुकडे मिळवून दिले आहेत… सत्तेचा हा लाभ राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते जनमताचा कोणताही कौल मिळाला नसताना घेत आहेत. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने चांदीचे ताट आहेच… पण मुद्दा त्या पुढचा आहे… या चांदीच्या ताटाचा लाभ राष्ट्रवादीच्या काही विशिष्ट नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मिळाला आहे आणि बाकीचे तसेच उपाशी राहिले आहेत… नेमके हेच कटू सत्य त्या कार्यकर्त्याच्या तोंडून बाहेर आले आहे…!!