विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक शहर आणि विशेषतः रामतीर्थ, पंचवटी परिसराच्या विकासात पुरोहित संघाचे योगदान मोलाचे असून या संघाला विश्वासात घेऊनच कुंभमेळ्याचे नियोजन केले जाईल, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी केले.
श्रीगंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी आणि संघटक धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी खत्री बोलत होत्या. पुरोहित संघाच्या नूतन कार्यकारणीचे मनीषा खत्री यांनी स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गोदावरीच्या तीर्थांवर तसेच कुंभमेळा काळात येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या सुविधा कशा देता येतील, त्याचे नियोजन करून गोदावरी प्रेमींना ते कसे सुखावह ठरेल, कुंभमेळा निर्विघ्नपणे व्हावा यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याचीही बैठकीत विस्तृत चर्चा झाली. मनीषा खत्री यांनी पुरोहित संघाच्या सदस्यांच्या सूचना जाणून घेऊन त्याचा योग्य आदर बाळगला जाईल, असे आश्वासन दिले.
रामकाल पथाचे सादरीकरण
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात रामकुंड आणि आजूबाजूच्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे हा परिसर स्वच्छ तसेच सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पुरोहित संघाचीही आहे, असे सांगून आयुक्तांनी यावेळी रामकाल पथाचे सादरीकरण केले. केंद्र सरकारच्या मदतीने नाशिक महापालिकेच्या समन्वयाने होत असलेल्या या नाशिक साठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे विस्तृत विवेचन करताना त्यांनी रामतीर्थाचा बदलणारा चेहरा मोहरा, पुरोहितांसाठी आणि रोजच्या येणाऱ्या भाविकांसाठी आणि यजमानांसाठी भविष्यात कोण कोणत्या सुविधा कशा पद्धतीने केल्या जाणार आहेत, याची सविस्तर माहिती दिली.
रामकाल पथ योजनेतील अनेक बाबींवर पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी समर्पक सूचना केल्या. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रामतीर्थाचा चेहरा मोहरा बदलणारा ठरेल, अशी खात्री व्यक्त केली. यामुळे रामतीर्थ आणि संपूर्ण गोदाकाठी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, याबाबत पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी आशा व्यक्त करीत महापालिकेचे अभिनंदन केले. पुरोहित संघाच्या भावनात्मक सूचनांचा महापालिका नक्कीच सकारात्मक विचार करेल. पुरोहित संघाच्या बरोबर सातत्याने समन्वयाची भूमिका ठेवेल, अशी ग्वाही मनीषा खत्री यांनी दिली.
या बैठकीस पुरोहित संघाचे उपाध्यक्ष वेदमूर्ती शेखर शुक्ल, नितीन पाराशरे, निखिल देव, कोषाध्यक्ष वैभव क्षेमकल्याणी, सचिव वैभव दीक्षित, हरीश आंबेकर, गायधनी, अमित पंचभैये, अमित गायधनी, सदानंद देव, राहुल अगस्त्ये, उपेंद्र देव, सौरभ गायधनी, मंदार देव, माणिक शिंगणे आदी पदाधिकारी तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Nashik Municipal Commissioner Manisha Khatri’s assurance
महत्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे संसदेतील संपूर्ण भाषण; काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले- इतकी चर्चा करा की शत्रू घाबरेल!
- जगातल्या कुठल्याही नेत्याने Operation Sindoor थांबवायला सांगितले नाही; डोनाल्ड ट्रम्पच्या 25 दाव्यांना मोदींचा एकच फटका
- Bihar SIR : बिहारमध्ये SIR वर तूर्त बंदी नाही; SCने ECला विचारले- आधार कार्ड व मतदार ओळखपत्र का समाविष्ट करत नाही?
- Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, थरूर म्हणाले – मौन व्रत; संसदेत काँग्रेसच्या विचारसरणीवर बोलण्यास नकार दिल्याची चर्चा