विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अखेर भाजपने हेवीवेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले. भाजपच्या मुख्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकात त्यांची उमेदवारी जाहीर केल्याची बातमी आहे. नारायण राणेंचा मुकाबला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याशी होईल. नारायण राणे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीमुळे संपूर्ण कोकणातली लढत आता भाजपच्या बाजूने झुकली आहे. Narayan Rane is the Lok Sabha candidate
नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आधीच आपला प्रचार सुरू केला आहे. ते गावागावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन मतदारांशी देखील संपर्क साधत आहेत. नारायण राणे यांना काँग्रेस मधून भाजपमध्ये घेताना संपूर्ण कोकणामध्ये भाजपचा दबदबा वाढवण्याचा पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा होरा होताच. नारायण राणे यांनी कोकणात भाजपचे नेटवर्क मजबूत करावे, केंद्रामधल्या जास्तीत जास्त योजना कोकणातल्या लाभार्थ्यांमध्ये पर्यंत पोहोचवून कोकणातला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वरचष्मा कमी करावा हा या मागचा हेतू होता. नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रीपदाने तो बऱ्यापैकी साध्य झाला.
नारायण राणे यांनी कोकणातली लोकल उद्योग क्लस्टर मजबूत करण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने भाजपचे पक्ष संघटन जास्तीत जास्त गावांपर्यंत कसे पोहोचवले जाईल याचेही प्रयत्न केले. यामध्ये त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सामील करून घेतले इतकेच नाही तर कोकणाच्या स्थानिक राजकारणातले आपले जुने प्रतिस्पर्धी दीपक केसरकर यांच्यासारख्या नेत्यांची देखील नारायण राणे यांनी जुळवून घेतले.
नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीमुळे कोकणाची संपूर्ण राजकीय फेररचना होताना दिसत आहे. शिवसेनेचा रायगड आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रभाव टप्प्याटप्प्याने कमी झाल्याचे दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये आल्याने रायगड मध्ये सुनील तटकरे यांचे देखील थोडेफार बळ भाजपला मिळणार आहे. एकेकाळी कोकण हा फक्त आणि फक्त शिवसेनेचा बालेकिल्ला होता. तो बालेकिल्ला टप्प्याटप्प्याने ढासळवत आता तो भाजपच्या पारड्यात आणण्याचे काम भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी नारायण राणे यांच्यावर सोपवले होते. ते त्यांनी पूर्ण करत आणल्याचे दिसत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांची उमेदवारी हे त्याचेच निदर्शक आहे.