विशेष प्रतिनिधी
मुंबई : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद कोर्टाच्या दणक्यानंतर मागे घ्यावा लागला तरी महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करण्यावर ठाम राहिले होते. जनआंदोलनाच्या रेट्यातून शिंदे – फडणवीस सरकारला वठणीवर आणण्याचा त्यांचा इरादा होता. परंतु या इराद्यावर मुंबई ठाणे परिसरात तसेच पुण्यात देखील पावसाने पाणी फिरवले. महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी आंदोलन जरूर केले. परंतु ते आंदोलन विस्कळीत झाले. उद्धव ठाकरेंनी मुंबईत आंदोलन केले. शरद पवारांनी पुण्यात आंदोलन केले, तर काँग्रेसच्या नेत्यांनी नागपुरात जाऊन आंदोलन केले. आंदोलनाद्वारे महाविकास आघाडीची एकजूट फारशी दिसली नाही.
उद्धव ठाकरे यांनी दादर येथील सेना भवन परिसरात तोंडाला काळा मास्क, तर दंडावर काळी फित बांधून निषेध व्यक्त केला. उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे, सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मला या सरकारची कीव येते. नराधमांच्या विरोधात उभं राहण्याऐवजी ते त्यांच्यावर पांघरुण घालण्याचं काम करत आहे, पाठीशी घालत आहेत. नराधमांच्या विरोधात भूमिका घ्यायला हवी होती. पण ज्या ज्या वेळी सर्व दरवाजे बंद होतात. त्यावेळी जनतेला रस्त्यावर उतण्याखेरीज पर्याय नसतो. आज खरं तर महाराष्ट्र बंद कडकडीत झाला असता, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली. त्यांच्यात संकटांचा सामना करण्याची हिंमत नाही. त्यामुळे त्यांनी आपले चेलेचपाटे कोर्टात पाठवले आणि अडथळे निर्माण केले. कोर्टाचेही आभार.. आम्हाला समजलं की आमच्या खटल्यासाठी दोन वर्ष तारीख पे तारीख सुरु आहे. पण ठरवलं तर कोर्ट एवढं त्वरेने हलू शकतं, हे समजलं. त्यासाठी कोर्टाचे अभिनंदन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रत्येक घरात अत्याचार आणि मिंधे सरकार विरोधात मशाल धगधगत आहे. गेल्या आठवड्यात भारत बंद काही राज्यात पुकारला. त्यावेळी रेल्वे बंद झाल्या होत्या. तेव्हा याचिकाकर्ते कुठे गेले होते. बंदला विरोध करणारे याचिकाकर्तेही तितकेच विकृत आहेत. राज्यकर्त्यांचे ‘सदा’ आवडते लोक आहेत हे, तुम्हाला शोभा देत नाही. यात राजकारण आणताय. महिला जाब विचारत आहेत, का आमच्या सुरक्षेच्या आड येताय? पण हे आंदोलन थांबता कामा नये. बस डेपो, रिक्षा स्टँड, चौकात स्वाक्षरी मोहीम घ्या. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित. इथे बहिणींवर अत्याचार होत आहेत आणि कंस मामा राख्या बांधत फिरत आहेत. इतकं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी ‘फाशी द्या, नराधमाला फाशी द्या’, ‘नको आम्हाला पंधराशे, महिलांना सुरक्षा द्या’, ‘शक्ती कायदा झालाच पाहिजे’, ‘चिमुरडीला न्याय द्या, नाहीतर खुर्ची रिकामी करा’ अशा घोषणा देण्यात आल्या. सर्व वयोगटातील महिला या आंदोलनात सहभागी होत सरकारविषयी रोष व्यक्त करत होत्या.
याआधी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन केले, तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे, बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर, तर यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथे निषेध आंदोलन केले. याशिवाय ठाकरे गटाने ठाणे येथे केदार दिघे, तर वरळीत सचिन अहिर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.
MVA agitation against shinde – fadnavis government dispersed
महत्वाच्या बातम्या
- Ramdas Athawale : ‘बदलापूरची घटना मानवतेसाठी लज्जास्पद असून आरोपींना…’ ; रामदास आठवले
- Ladki Bahin Yojna : 1 कोटी 40 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये रक्कम जमा; मुख्यमंत्र्यांची नाशकातून माहिती
- Bangladesh : बांगलादेशात अस्मानी, आरोप मात्र भारतावर; युनूस सरकारने म्हटले- भारताने पाणी सोडल्याने पूर आला
- Maharashtra Bandh : हायकोर्टाच्या दणक्यानंतर पवार + काँग्रेस नरमले; महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे आवाहन केले!!