वृत्तसंस्था
मुंबई : मुस्लिम मतांवर ठाकरेंचे उमेदवार जिंकले, शिवसेना – भाजप महायुतीचे उमेदवार पडले, पण काँग्रेसचे नेते हादरले!!, अशी राजकीय परिस्थिती मुंबईत झाली आहे.Muslim voters turned to UBT shivsena sparks buzz in Congress
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी मुंबईमध्ये लोकसभेच्या 3 जागांवर विजय मिळवला. या तीनही मतदारसंघांतील कुर्ला, भायखळा, मुंबादेवी, मानखुर्द शिवाजीनगर, अणुशक्तीनगर यासारख्या विधानसभा मतदारसंघांनी विजयासाठी मतबळ दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे या सर्व मतदारसंघांत मुस्लिम समाजाचे प्राबल्य असून भाजपवर नाराज असलेला हा समाज आता नरेंद्र मोदी आणि भाजपला थेट अंगावर घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे वळला. शिवसेनेचा पारंपरिक नसलेला हा नवा मतदार मिळाल्याने ठाकरे गटात एकीकडे उत्साहाचे वातावरण असले तरी काँग्रेससाठी मात्र ही धोक्याची घंटा ठरणार आहे.
अरविंद सावंत यांचा विजय
ज्या दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत निवडून आले त्या मतदारसंघात भायखळा आणि मुंबादेवी हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. हे मतदारसंघ मुस्लिमबहुल आहेत. यातील भायखळा विधानसभा मतदारसंघात सावंत यांना ८६ हजार ८८३, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार यामिनी जाधव यांना ४० हजार ८१७ मते मिळाली आहेत. येथे जाधव यांच्यापेक्षा सावंत यांना ४६ हजार ६६ मते जास्त आहेत. त्यानंतर मुंबादेवी मतदारसंघात सावंत यांना ७७ हजार ४६९, तर जाधव यांना ३६ हजार ६९० मते आहेत. येथे सावंत यांना जाधव यांच्यापेक्षा ४० हजार ७७९ मते जास्त आहेत. अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांचा ५२ हजार ६७३ मतांनी पराभव केला आहे. भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघांत मिळालेली जवळपास ८० हजार मतांची आघाडी सावंत यांच्या विजयास आणि जाधव यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.
मिहीर कोटेचांचा पराभव
उत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय दिना पाटील यांनी २९ हजार ८६१ मतांनी पराभव केला. मुलुंडमध्ये कोटेचा यांना १ लाख १६ हजार ४२१ मते मिळाली, तिथे पाटील यांना निम्मी अर्थात ५५ हजार ९७९ मते मिळाली. या विधानसभा मतदारसंघात कोटेचा यांनी ६० हजार ४४२ मतांची आघाडी घेतली. मात्र मानखुर्द शिवाजीनगर येथे कोटेचा यांना २८ हजार १०१ मते, तर संजय पाटील यांना १ लाख १६ हजार ७२ मते मिळाली आहेत. मुस्लिम लोकवस्ती सर्वाधिक असलेल्या या मतदारसंघात संजय पाटील यांना कोटेच्या यांच्यापेक्षा ८७ हजार ९७१ मतांची आघाडी मिळाली आहे. ही आघाडीच कोटेच्या यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. या मतदारसंघातील मतांच्या आघाडीने कोटेच्या यांच्या मुलुंडमधील मतांच्या आघाडीवर मात केल्याचे दिसते.
राहुल शेवाळेंचा पराभव
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आमदार नवाब मलिक यांचा अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिमबहुल आहे. या मतदारसंघात देसाई यांना ७९ हजार ७६७ मते, तर शेवाळे यांना ५० हजार ६८४ मते मिळाली आहेत. येथे देसाई यांनी शेवाळे यांच्यापेक्षा २९ हजार ८३ हजार मतांची आघाडी घेतली आहे. देसाई हे शेवाळे यांच्यापेक्षा ५३ हजार ३८४ अधिक मते घेऊन निवडून आले आहेत. देसाई यांच्या विजयात अणुशक्तीनगरमधील २९ हजार मतांचा वाटा मोठा आहे.
वर्षा गायकवाड यांचा विजय
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला आहे. गायकवाड यांनी निकम यांचा १६ हजार ५१४ मतांनी पराभव केला आहे. या लोकसभा मतदारसंघातील कुर्ला विधानसभा मतदारसंघात निकम यांना ५८ हजार ५५३ हजार मते, तर गायकवाड यांना ८२ हजार ११७ मते मिळाली आहेत. येथे गायकवाड यांनी निकम यांच्यापेक्षा २३ हजार ५६४ मतांची आघाडी घेतली. याशिवाय वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात निकम यांना ४७ हजार ५५१ मते, तर गायकवाड यांना ७५ हजार १३ मते मिळाली. येथे गायकवाड यांनी निकम यांच्यापेक्षा २७ हजार ४६२ मतांची आघाडी घेतली आहे. मुस्लिम लोकवस्ती अधिक असलेल्या या दोन विधानसभा मतदारसंघांतील जवळपास ५० हजार मतांच्या आघाडीने वर्षा गायकवाड यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे आघाडीतील घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे गायकवाड यांचा हा विजय सुकर झाल्याचे बोलले जाते.
औरंगाबादेत मात्र फटका
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या संदिपान भुमरे यांनी ४ लाख ६८ हजार १३८ मते घेत विजय मिळवला. या मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाचे चंद्रकांत खैरे यांना २ लाख ८६ हजार मते मिळाली आहेत. मात्र, ‘एमआयएम’चे इम्तीयाज जलील यांना ३ लाख ३७ हजार मते पडली. येथे मुस्लिम समाजाचा उमेदवार रिंगणात नसता तर भुमरे आणि खैरे यांच्यात थेट लढत होऊन येथे मुस्लिम समाजाच्या मतांचा फायदा खैरे यांना होऊ शकला असता. मात्र, मुस्लिम उमेदवार रिंगणात असल्याने त्यांना फटका बसल्याची चर्चा आहे.
पण या सगळ्यात मुस्लिम मतांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा झाला काँग्रेसचे नेते हादरले आहेत कारण मुस्लिम मतदार जर ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळला आणि विधानसभा तसेच महापालिका या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी टिकली नाही, तर काँग्रेसच्या पारंपरिक मुस्लिम मतदार घटेल आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका पक्षाच्या उमेदवारांना बसेल, याची भीती काँग्रेस नेत्यांना वाटू लागली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या 150 जागा लढवण्याचा निर्धार बोलून दाखविला आहे. या 150 जागा लढाविताना त्यांच्या डोळा प्रामुख्याने मुस्लिम मतांवरच आहे. अशावेळी मुस्लिम मतदार ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात विभागला गेला, तर दोन्ही पक्षांना भविष्यकाळात मोठा फटका सहन करावा लागण्याची भीती आहे.
Muslim voters turned to UBT shivsena sparks buzz in Congress
महत्वाच्या बातम्या
- NDA 8 जून करू शकते सरकार स्थापनेचा दावा; राष्ट्रपती भवनात 9 जूनला शपथविधीची शक्यता
- दिल्ली विमानतळावर स्टालिन + चंद्राबाबू यांच्यात नुसत्याच गाठीभेटी; की NDA – INDI आघाडीत एकमेकांची सेंधमारी??
- मुस्लिम प्रभाव क्षेत्रात एकगठ्ठा मतदानाचा भाजपला देशभरात 30 % फटका!!; ममता + राहुल + अखिलेश + उद्धव या “लाभार्थीं”च्या जागा वाढल्या!!
- NDAच्या बैठकीपूर्वी नितीश सरकारने केली ‘ही’ मोठी मागणी