विनायक ढेरे
मुंबई ठाणे पुण्यासह 16 महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना जन्माष्टमी, दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर राजकीय होणार हे सांगायला कोणत्या राजकीय रॉकेट सायन्स अभ्यास करण्याची गरज नव्हती, तशीच आज राजकीय दहीहंडी पार पडते आहे. पण या सगळ्यात मुंबई, ठाणे, पालघर पट्ट्यात या राजकीय दहीहंडीत बोलबाला मात्र शिवसेनेचा शिंदे गट – भाजप, शिवसेनेचा ठाकरे गट आणि मनसे यांचाच दिसून येत आहे. त्यांचे खरे राजकीय प्रतिस्पर्धी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा मागमूसही कुठे दिसून येत नाही!! मराठी प्रसार माध्यमांची वेब पोर्टल्स देखील मुंबई, ठाणे पट्ट्यातल्या वर उल्लेख केलेल्या राजकीय गटांच्या आणि पक्षांच्याच दहीहंडीच्या बातम्यांनी भरलेली दिसत आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लाइव्ह रिपोर्टिंग देखील याच राजकीय पक्षांभोवती आणि गटांभोवती केंद्रित झाले आहे. जितेंद्र आव्हाड यांची एखाद दुसरी प्रतिक्रिया वगळता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या सगळ्या राजकीय दहीहंडीत कुठेच दिसत नाहीत!! MUMBAI – Political tussle in Thane; Shinde Group, BJP, Thackeray Group
शिवसेना विरुद्ध मनसे सामना असायचा
आत्तापर्यंतच्या राजकीय दहीहंडीत शिवसेना विरुद्ध मनसे मध्येच भाजप असे अनेक वर्ष सामने रंगले आहेत. त्यामध्ये 2022 च्या राजकीय दहीहंडीत एकनाथ शिंदे गटाची भर पडली आहे. त्यातही शिवसेनेत एकनाथ शिंदे गट राजकीय दृष्ट्या कमालीचा यशस्वी झाल्याने शिंदेंच्या भाषणात देखील त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसले आहे. एकापाठोपाठ एक 50 थर लावून आम्ही राजकीय दहीहंडी जिंकली, असे वक्तव्य त्यांनी मुंबई ठाणे पट्ट्यातल्या सर्वात प्रतिष्ठेच्या टेंभी नाका दहीहंडी उत्सवात केले आहे. ही सरळ सरळ शिवसेनेतल्या ठाकरे गटावर मात आहे. शिवसेनेतल्या ठाकरे गटाने आपली राजकीय चमक दाखवण्यासाठी तेजस ठाकरे याच्या फोटोचा युवाशक्ती म्हणून वापर केला आहे. पण ती चमक मुंबई पट्ट्या पुरतीच मर्यादित आहे. ठाण्यामध्ये फारसा त्याचा प्रभाव नाही. उलट ठाण्यात एकनाथ शिंदे घटाने बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टर्स भरपूर वापर करून शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. शत्रू शत्रूच असतो. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कधीच जाणार नाही, अशा वक्तव्यांची रेलचेल ठरवून केली आहे.
मुंबईतल्या भांडुप व्हिलेज मध्ये 9 थरांची दहीहंडी विक्रमी ठरल्याने मनसेचा बोलबाला जोरात आहे.
ठाण्यामध्ये एकेकाळी शिंदे गटातले अनेक नेते विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांची दहीहंडी यांचा कलगीतुरा रंगत असे. पण सगळे ठाणे आता शिंदेमय झाले आहे. गोविंदांविषयी वेगवेगळे निर्णय घेऊन एकनाथ शिंदे यांनी गोविंदांमधल्या लोकप्रियतेत बाजी मारली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजपच्या सगळ्या दहीहंड्यांमध्ये सामील होऊन भाजप देखील शिंदे गटापेक्षा कमी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मागमूस नाही
महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय दहीहंडीचे शक्ती प्रदर्शन जोरात असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा मागमूस मात्र कुठेही दिसत नाही. वास्तविक मुंबई पट्ट्यात काँग्रेसची शक्ती शिवसेनेच्या खालोखालच्या शक्ती बरोबर मानली जात होती. काँग्रेसचे एकेकाळी 6 खासदार मुंबईने दिले आहेत. वर्षानुवर्षे मुंबईतून काँग्रेसचे खासदार निवडून येत होते. संघटनात्मक पातळीवर देखील काँग्रेसचे जाळे राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा कितीतरी मजबूत आहे. पण तरी देखील 2022 च्या दहीहंडीत ना काँग्रेसच्या मागमूस दिसतो आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मागमूस दिसण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.
दहीहंडीच्या मुहूर्तावर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन सदिच्छा भेट घेतली आहे. ही राजकीर हालचाल सोडली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात राजकीय दहीहंडीच्या दिवशी शांतता दिसत आहे. मुंबई ठाणे पट्ट्यातल्या महापालिकांचा निकाल या दहीहंडीतून स्पष्ट दिसतो आहे का? या कळीच्या सवालावर खरे म्हणजे राजकीय पक्षांनी आणि निरीक्षकांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे!!
MUMBAI – Political tussle in Thane; Shinde Group, BJP, Thackeray Group
महत्वाच्या बातम्या
- देशभरात जन्माष्टमीची धूम : मुंबईत दहीहंडीची तयारी, बांकेबिहारीच्या रंगात रंगली मथुरा, मंदिरांमध्ये भावि
- मथुरेसह देशभर कृष्ण जन्माष्टमी उत्साहात, पाहा फोटो!!
- राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय : दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक मदत, या आहेत अटी-शर्थी
- उद्धव ठाकरे अखेर पडणार मुंबई बाहेर; संजय राठोडांना शह देण्यासाठी पहिलाच दौरा पोहरादेवीचा!!