नाशिक : एरवी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमी आपल्यावरच्या आई-वडिलांच्या संस्काराचा हवाला देऊन काही उपदेशात्मक गोष्टी महाराष्ट्रात बोलत असतात. महाराष्ट्राला सभ्य सुसंस्कारित राजकारणाचे धडे देत असतात. महाराष्ट्रात शरद पवारांनी नेहमीच सभ्य + सुसंस्कृत राजकारण केले आणि आज त्या राजकारणाचा स्तर घसरला आहे, अशी खंत व्यक्त करत असतात. पण प्रत्यक्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीचे “संस्कार” असे आहेत, की ते सगळे मिळून महाराष्ट्रात चिखलफेकीचा “अविष्कार” सादर करत आहेत. “पवारनिष्ठ” माध्यमांचे याकडे फारसे लक्ष गेलेले नाही. किंवा ते हेतूतः त्याकडे लक्ष देत नाहीत. ते फक्त पवार काका – पुतणे केव्हा एक होतात आणि महाराष्ट्रात पुन्हा राजकारणाचा चिखल चिवडतात, याकडे लक्ष पुरवून आहेत, पण म्हणून पवारांचे मूलभूत “संस्कार” आणि त्याचे “अविष्कार” यातले सत्य लपून राहत नाही!!
बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवृत्तीचे असे काही “संस्कार” सगळ्या महाराष्ट्राला दिसत आहेत, की ज्याने सगळ्या महाराष्ट्राची तोंडे बोटात गेली आहेत. धनंजय मुंडे + वाल्मीक कराड विरुद्ध सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आणि बाकीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये असे काही धुमशान सुरू आहे की, त्यामुळे अवघा महाराष्ट्र अवाक झाला आहे. त्यात सुरेश धस यांच्यासारख्या नेत्याने प्राजक्ता माळीचे नाव ओढून राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीतल्या चिखलफेकीचे शिंतोडे भाजपवर उडवून टाकले आहेत.
– आरोपींच्या संपत्तीवर टांच
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे वेगवेगळे धागेदोरे टप्प्याटप्प्याने उलगडत आहेत. त्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सीआयडीला देऊन कायदेशीर पातळीवर पुढचे पाऊल टाकले आहे. त्यामुळे आरोपी आणि त्यांच्या भोवती असलेल्या “संरक्षक” कवचांचे धाबे खऱ्या अर्थाने दणाणले आहेत. कारण आता त्यांच्या संपत्तीवर टांच आली आहे.
Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट
पण या एकूण प्रकरणात मूळात शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीचे “संस्कार” आहेत. त्यातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या राजकीय + सामाजिक + व्यावसायिक अपप्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत. विकासाच्या नावाखाली ठिकठिकाणी आपल्याच माणसांना विविध व्यवसायांची कंत्राटे देणे, कंत्राटदारांचे जाळे निर्माण करणे, त्यातूनच एखादा राजकीय नेता निर्माण करून आधी तालुक्यावर, नंतर विभागावर आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण करणे, जिल्ह्यातली कुठलीच कामे आपल्या कंत्राटदारांच्या जाळ्या बाहेर जाताच कामा नयेत यासाठी पालकमंत्री पदाचा वैध अवैध उपयोग करणे, हे सगळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीचे “संस्कार” आहेत, ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये “अविष्कृत” होताना दिसत आहेत.
उदाहरणच द्यायचे झाले, तर सुरेश धस आज जरी आष्टीतून भाजपच्या कमळ चिन्हाचे आमदार असले, तरी मूळात ते पवारांच्या राष्ट्रवादीतलेच नेते आहेत. म्हणूनच त्यांच्या तोंडी भाजपच्या संस्कारातली नसलेली “रगेल” भाषा आली. त्यांनी त्या “रगेल” भाषेतच अमोल मिटकरी यांना दम देऊन टाकला. धनंजय मुंडे एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस होते. पण ते त्यांच्या तरुण वयातच पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीत शिरल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाचे वेगवेगळे “अविष्कार” बाहेर पडले, ते आता संतोष देशमुख हत्येच्या रूपाने सगळ्या महाराष्ट्राला दिसले. संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके हे आज जरी परस्पर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले, तरी त्यांचे मूळ “संस्कार” पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीतलेच आहेत हेही या निमित्ताने महाराष्ट्रासमोर आले.
सुरेश देशमुख यांची हत्या झाली. ही माणुसकीची हत्या होती. यात कुठलाही जातीय अँगल निदान सुरुवातीला नव्हता. पण या प्रकरणात मनोज जरांगे यांनी एन्ट्री घेतली. त्यानंतर संभाजीराजे आले. त्यामुळे आपोआपच या प्रकरणाला जातीय रंग प्राप्त झाला. जरांगे आणि संभाजीराजे यांची भूमिका यासंदर्भात एक आहे. ते देखील पवारांशीच “कनेक्टेड” आहेत, उघड गुपित पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर अधोरेखित झाले.
याच दरम्यान जितेंद्र आव्हाड आणि रूपाली ठोंबरे यांच्यातील ट्विटर चिखलफेक महाराष्ट्रला दिसली. आव्हाड आणि रूपाली ठोंबरे हे देखील पवारांच्या राष्ट्रवादी प्रवृत्तीचे प्रवृत्तीच्या संस्कारांचे दोन आविष्कार आहेत.
या “राजकीय संस्कारित” सत्याकडे मराठी माध्यमांनी पूर्ण दुर्लक्ष केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे त्यातल्या धनंजय मुंडे + वाल्मीक कराड अँगलचे माध्यमांनी विविध अंगानी रिपोर्टिंग केले असले, तरी त्यातला मूलभूत राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीचा “संस्कार” रिपोर्टिंग मधून मराठी माध्यमांनी वगळला. म्हणून त्याकडे आवर्जून लक्ष वेधायची गरज आहे.
Mudslinging in NCP over santosh deshmukh case
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Chennai rape case : चेन्नई रेप केस- पोलिसांनी पीडितेची ओळख उघड केली; निषेधार्थ अण्णामलाई यांनी स्वत:ला चाबकाचे फटके मारले
- Manipur : मणिपूरच्या दोन जिल्ह्यांत गोळीबार, मोर्टार डागले; कुकी-मैतेई यांच्यात पुन्हा हिंसाचार सुरू