विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२०मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पूर्व परीक्षेतून 3 हजार 214 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. MPSC Exam Result 2020: Results of State Service Pre-Examination Announced; Selection of three thousand candidates: see list
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आयोगाने मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली आहे.
मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० लांबणीवर पडली होती. परीक्षेची तारीख लांबत असल्याने उमेदवारांकडून विविध मार्गांनी सरकारचं याकडे लक्ष वेधण्यात आलं होतं.
विद्यार्थ्यांकडून सातत्याने मागणी करण्यात आल्यानंतर २१ मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. पूर्व परीक्षा पार पडल्यानंतर निकाल कधी जाहीर होणार याकडे उमेदवारांचं लक्ष होतं. अखेर निकाल जाहीर करण्यात आला आहे.
पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी आयोगाने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यात पुणे विभागातून सर्वाधिक १ हजार ७२ उमेदवारांची निवड झाली आहे. तर त्यानंतर औरंगाबाद येथील २४१, नाशिक येथील २२०, कोल्हापूर येथील १६९, अहमदनगर येथील १७७ उमेदवारांची निवड झाली आहे.