प्रतिनिधी
पुणे – कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी कमी करण्यासाठी पुणे मार्केट यार्डात किरकोळ फळभाजी विक्रीला अखेर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आडते आणि खरेदीदारांना पासशिवाय मार्केटयार्डात यापुढे प्रवेश मिळणार नाही. more restrictions imposed in pune marketyard to prevent crowd
महाराष्ट्रात कठोर निर्बंध लावून देखील अनेक शहरांमधील गर्दी कमी व्हायलाच तयार नाही. कोरोनाची भयानकता वाढत असताना निर्बंध पाळण्यात कोणतेही गांभीर्य नाही. शेवटी पुण्यात प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
- प्रत्येक आडत्याला फक्त चार पास, – ओळखपत्राशिवाय बाजारात प्रवेश नाही
- मार्केट यार्डात रिक्षा संपूर्ण बंद, गेट नंबर 7 फक्त व्यावसायिक वाहेन उभी राहतील
- डमी विक्रेते आणि किरकोळ लिंबू विक्री बंद
- 30 पोलीस आणि बाजार समिती कर्मचारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी
- नियम मोडले तर गुन्हे दाखल करणार
- भुसार बाजारातील सर्व मालाच्या गाड्या 12 नंतर खाली होणार
- वाहनतळावर पास किंवा ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश नाही. अन्यथा संबधित ठेकेदारावर कारवाई
- 30 तारखेपर्यंत बाजार समिती, वाहतूक पोलीस, पोलीस यांच्या समन्वयाने बाजार सुरू राहणार
दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढत आहे. बेड, व्हेटिंलेटर, ऑक्सिजन यांसारख्या आरोग्य सुविधा मिळवताना रुग्णांच्या नाकीनऊ येत आहे.
मात्र अशा स्थितीतही काही नागरिक विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतात. त्यामुळे आगामी काळात शहरातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारी ओळखून शिस्त पाळणे गरजेचे ठरणार आहे, पोलीस आणि प्रशासनाचे म्हणणे आहे.