कोरोना काळात आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे महत्त्व वाढले आहे. अशात संरक्षण मंत्रालयाने देशातील ३७ कॅन्टोन्मेंट रुग्णालयांबरोबरच आता लष्करी वैद्यकीय सेवेच्या (एएफएमएस) १२ लष्करी रुग्णालयांमध्ये ही आयुर्वेदिक उपचार केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Ministry of defence take decision now ayurvedic facility available in army hospitals
विशेष प्रतिनिधी-
पुणे : कोरोना काळात आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे महत्त्व वाढले आहे. अशात संरक्षण मंत्रालयाने देशातील ३७ कॅन्टोन्मेंट रुग्णालयांबरोबरच आता लष्करी वैद्यकीय सेवेच्या (एएफएमएस) १२ लष्करी रुग्णालयांमध्ये ही आयुर्वेदिक उपचार केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पुण्यातील कमांड रुग्णालयाचा देखील समावेश आहे.
संरक्षण मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाने यासाठी सामंजस्य करार केला आहे. गुजरात येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात हा करार करण्यात आला. यावेळी एएफएमएसचे महासंचालक सर्जन व्हाइस ऍडमिरल रजत दत्ता, आयुष मंत्रालयाचे प्रमोद पाठक आणि संरक्षण मालमत्ता विभागाचे अतिरिक्त महासंचालक सोनम यंगदोल उपस्थित होते. गेल्या महिन्यात देशातील ३७ कॅन्टोन्मेंट रुग्णालयात ही केंद्रे कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पुण्यातील खडकी आणि देहूरोड या दोन कॅन्टोन्मेंट रुग्णालयांचा समावेश होता. त्या पाठोपाठ आता लष्करी रुग्णालयांमध्ये ही केंद्रे सुरू होणार आहेत. पुण्यातील दक्षिण मुख्यालय येथील कमांड रुग्णालयात असे एक केंद्र तयार होणार असून येत्या १ मे पासून हे आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू होणार आहेत. पारंपारिक आयुर्वेदिक औषधोपचार पद्धतीचा लाभ रुग्णांना मिळावा या अनुषंगाने ही केंद्रे सुरू होणार आहेत. या माध्यमातून कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवासी, सशस्त्र दलातील जवान, अधिकारी त्यांचे कुटुंबीय आदींना वेळेत आयुर्वेदाच्या प्रभावी औषधोपचारांचा लाभ मिळणार आहे.