उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कथित बंडानंतर मराठी माध्यमांनी 82 वर्षांचा योद्धा चाणक्य आता मैदानात. नव्याने पक्ष बांधणी करणार वगैरे वर्णने सुरू केली. पण त्यामुळेच प्रश्न पडला, की या 82 वर्षांच्या योद्धा चाणक्याला इतकी वर्षे खरा “चंद्रगुप्त” का नाही सापडला?? आणि “मनातल्या चंद्रगुप्ताला” महाराष्ट्राच्या गादीवर बसवणे, सोडा पक्षाच्याही गादीवर का बसवता आले नाही??, हे कळीचे प्रश्न आहेत. शिवाय आत्तापर्यंत बाळगलेला “दुसरा अमात्य कात्ययन” एवढा थेट विरोधात का गेला??, हा उपप्रश्नही आहेच!! Media abundantly praise sharad pawar, but why couldn’t he enthrone his daughter in NCP??
प्रफुल्ल पटेल यांची साथ अजितदादांना
अजित पवारांच्या कथित बंडात प्रफुल्ल पटेल यांची साथ आहे. काल आणि आज प्रफुल्ल पटेल अजितदादांची राष्ट्रीय पातळीवरच्या विविध चॅनेलवर पाठराखण करत आहेत. किंबहुना शरद पवारांचा अजितदादांच्या या बंडाला पाठिंबा असल्याचेच ते वारंवार सांगत आहेत. अजित पवारांपेक्षा प्रफुल्ल पटेलांनीच शरद पवारांना दिलेला धक्का जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. कारण सुरेश कलमाडी यांच्यानंतर पवारांचे दिल्लीतले राजकारण सांभाळणे, त्यांचा दिल्लीतल्या राजकारणातला बाज टिकवून ठेवणे, हे काम आपल्या नेटवर्क कौशल्याने प्रफुल्ल पटेल यूपीए 1 पासून करीत होते. मग हेच प्रफुल्ल पटेल बाजूला गेल्याने पवारांची दिल्लीतल्या राजकारणाची आणि उद्योगपतींची असलेल्या थेट संबंध याची बाजू लंगडी पडली आहे का??, हा प्रश्न तयार झाला आहे.
भविष्यातला चेहराही पवारच??
त्यापलीकडे जाऊन अजितदादा आणि शरद पवार यांच्यातले द्वैत ज्यामुळे समोर आले, त्या खासदार सुप्रिया सुळे नामक “मनातला चंद्रगुप्त” पवारांसारखा ८२ वर्षांचा योद्धा चाणक्य अजून गादीवर का बसवू शकला नाही आणि तो स्थिरावला का नाही??, हा ही प्रश्न पडला आहे. काल सुप्रिया सुळे आणि आज आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये पवार साहेब 82 व्या वर्षी मैदानात उतरल्याचे उल्लेख केले. राष्ट्रवादीचा भविष्यातला चेहरा देखील 82 वर्षाचे पवारच आहेत, असे खुद्द तेच पत्रकार परिषदेत म्हणाले. म्हणजे पवार 82 वर्षांचे योद्धा चाणक्य आहेत हे खरे, पण मग या चाणक्याला “मनातल्या चंद्रगुप्ताला” आत्तापर्यंत कधीच गादीवर का बसवता आले नाही??
ठाकरे “चंद्रगुप्त” का निवडावा लागला??
जेव्हा 2019 मध्ये या चाणक्याला “मनातला चंद्रगुप्त” महाराष्ट्राच्या गादीवर बसविण्याची संधी आली होती, त्यावेळी ठाकरे घराण्यातल्या “चंद्रगुप्त” या चाणक्याने का निवडला?? त्याऐवजी घरातलाच “मनातला चंद्रगुप्त” बसविणे चाणक्याला का जमले नाही?? की त्यावेळी आत्ता सोडून गेलेल्या अमात्य कात्यायनाने तेव्हा देखील चाणक्याच्या “मनातला घरातला चंद्रगुप्त” गादीवर बसवायला विरोध केला असता, अशी भीती 82 वर्षांच्या या योद्धा चाणक्याला वाटली!!, हाही प्रश्न आहे.
मनातला चंद्रगुप्त अकार्यक्षम
बाकी माध्यमांनी 82 वर्षांचा योद्धा चाणक्य मैदानात उतरला, असा डंका कितीही पिटला तरी, 54 वर्षांचा घरातला “मनातला चंद्रगुप्त” राजकीय दृष्ट्या फारसा तयार होऊ शकला नाही, स्वतंत्रपणे काही उभे करण्याची क्षमता निर्माण करता आली नाही आणि खरंच राजकीय कसोटीवर जर उतरवला तर टिकणार नाही, याची भीती 82 वर्षांच्या योद्धा चाणक्याला वाटते आहे का??, हा ही सर्वात कळीचा प्रश्न आहे.
चाणक्याने गमावलेल्या संधी
वास्तविक या चाणक्याला आत्मचरित्राच्या विस्तारित प्रकाशनात माझ्या मनातल्या चंद्रगुप्तालाच गादीवर बसविले जाईल. ते सर्वांना मान्य करावे लागेल, असे ठणकावून बजावता आले असते. पण ती संधी देखील या चाणक्याने गमावली. अजित पवारांनी केलेले कथित बंड यशस्वी होव अथवा अयशस्वी होवो, मी माझ्या “मनातलाच चंद्रगुप्त” पक्षाच्या गादीवर बसवणार, हे या चाणक्याला 2 जुलै 2023 रोजी ठणकावून सांगता आले असते आणि या चंद्रगुप्ताला संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करायला लावून वातावरण निर्मिती करण्यास कृतिशील प्रोत्साहन देताही आले असते. पण ते या चाणक्याने दिले नाही. मग 54 वर्षांच्या या चंद्रगुप्ताची मुळात ती क्षमताच नाही याची साधार भीती चाणक्याला वाटली का??, हा कळीचाच प्रश्न आहे.
चाणक्याचे भूत – वर्तमान आणि भविष्य
या प्रश्नांची उत्तरे “चाणक्य – चंद्रगुप्त” यांना माहिती असली, तरी ती सांगायची नाहीत आणि कबूलही करायची नाहीत. तरी अमात्य कात्यानाला ही उत्तरे माहिती आहेत. किंबहुना सगळ्या महाराष्ट्राला ही उत्तरे माहिती आहेत. सवाल फक्त 82 वर्षांच्या योद्धा चाणक्याने ती उत्तरे कबूल करण्याचा आहे. पण सत्य कबूल करण्याचेङ, सत्याला सामोरे जाण्याचे खरे धाडस लागते, त्याचाच या चाणक्याकडे अभाव आहे. प्रीतीसंगमावर विसावलेल्या (अ)धाडसी राजकीय गुरूंचा हाच वारसा त्यांच्याकडे आला आहे. त्यामुळेच वयाच्या 82 व्या वर्षी पुन्हा मी पक्ष उभा करेन. संघटना उभी करेन, अशी प्रतिज्ञा करावी लागते, हेच या 82 वर्षाच्या योद्धा चाणक्याचे राजकीय भूत – वर्तमान आणि भविष्य आहे!!
Media abundantly praise sharad pawar, but why couldn’t he enthrone his daughter in NCP??
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांना दिली पक्ष प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी
- रात्रीस खेळ चाले; अजितदादांसह 9 मंत्र्यांवर राष्ट्रवादीने टांगली अपात्रतेची तलवार!!; विधानसभा अध्यक्षांना पाठविला ई-मेल आणि व्हॉट्स एप!!
- रात्रीस खेळ चाले; अजितदादांसह 9 मंत्र्यांवर राष्ट्रवादीने टांगली अपात्रतेची तलवार!!; विधानसभा अध्यक्षांना पाठविला ई-मेल आणि व्हॉट्स एप!!
- मोदींची 2019 ची मूळ योजना फलद्रूप; भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र, काँग्रेस एकाकी, त्यात ठाकरे – पवारांची भर!!