विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला मोठी आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या नरीमन पॉईंटमधील भाजप प्रदेश कार्यालयाला भीषण आगीची घटना घडली. Massive fire at BJP state office; Flare due to short circuit during welding work
रविवारी सकाळपासूनच येथे वेल्डिंगच्या काम सुरू होते. त्यावेळी अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मुळात ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
दुसरीकडे, रविवार असल्याने कार्यालयात कोणीही नव्हते. परंतु, कार्यालयाच्या मागील बाजूस सोशल मीडिया हॅण्डल करणारे काही कर्मचारी होते. त्यांना त्वरित बाहेर काढण्यात आले. हायप्रोफाईल एरिया असलेल्या नरिमन पॉईंट भागात आग लागल्याने सर्वत्र गोंधळ उडाला होता.
मुंबईतील नरीमन पॉइंट या भागात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय आहे. या कार्यालयात रविवार सकाळपासूनच नूतनीकरणाचे काम म्हणून काही ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यामुळे कार्यालयात अन्य कर्मचारी किंवा भाजप पदाधिकारी यांची कोणाचीही उपस्थिती नव्हती. मात्र, सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती समोर आली.
अतिशय कमी वेळात या आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे कार्यालयाच्या मागील बाजूस नुकसान झाले. आगीची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर अवघ्या काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
या कार्यालयात भाजपचे सोशल मीडियाचे काम चालतं. त्यामुळे निवडणुका असल्याने कालही सोशल मीडियाचं काम सुरू होतं. तेवढेच कर्मचारी ऑफिसमध्ये होते. आग लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी हातातील काम टाकून तत्काळ बाहेर धाव घेतली. सर्व कर्मचारी एका क्षणात ऑफिसच्या बाहेर पडले. त्यामुळे आगीत कोणीही अडकले नाही.
भाजपचं हे कार्यालय नेहमी नेते आणि कार्यकर्त्यांनी गजबजलेले असतं. मंत्री, आमदार, खासदारही याच कार्यालयात असतात. आमदार निवास आणि मंत्रालयाच्या परिसरातच हे कार्यालय असल्याने कार्यकर्त्यांनाही हे कार्यालय सोयीचं पडतं. त्यामुळे दिवसभर या कार्यालयात गर्दी असते. पण निवडणुका सुरू असल्याने सर्व नेते प्रचारात व्यग्र आहेत. रविवार असल्याने चाकरमानी घरी राहतात. त्यामुळे नेते सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचारात व्यग्र होते. त्यामुळे सोशल मीडियाचे कर्मचारी वगळता कुणीही कार्यालयात नव्हते. म्हणून अनर्थ टळल्याचं सांगण्यात येत आहे.