विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी भाषेसाठी जे-जे आम्ही करू त्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे. पण तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करू नका. आतापर्यंत आलेला अनुभव आहे. कारण आम्ही जे करत आहोत ते मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठीच करत आहोत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.
पुण्यात तिसर्या विश्व मराठी संमेललनाचा समारोप राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. ते म्हणाले, राज्य सरकारने आणि आम्ही-तुम्ही सर्वांनी आपली मराठी भाषा टिकवली पाहिजे. दुसऱ्या देशातील माणसं आपल्या देशाशी आणि भाषेशी खूप प्रामाणिक असतात. त्यांचा अभिमान आपल्यालाही वाटायला लागतो की ते त्यांच्या भाषेशी किती प्रामाणिक आहेत. आपल्या देशात सुद्धा स्वत:च्या भाषेशी प्रामाणिक लोक आहेत. आपल्या देशातील दुसरे राज्य जर त्यांच्या भाषेबाबत एवढा अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेत का बोलतो? एकमेकांना भेटल्यानंतर दुसऱ्या भाषेत कशासाठी बोलतो? आपली मुलं एकमेकांना बोलताना हिंदी मध्ये बोलतात. आता कार्यक्रमात आपल्याकडे राज्यगीत लागलं होतं. जय जय महाराष्ट्र माझा.., मग भारतातील दुसऱ्या राज्यात कोणत्या राज्याचं राज्यगीत आहे?
मराठी भाषेसाठी आपल्याला खूप गोष्टी कराव्या लागतील. सयाजी शिंदे यांनी आता सांगितलं की त्यांनी आफ्रिकेतील व्यक्तीशी मराठीत कसं भांडण केलं. आपण आपल्या भाषेवर नेहमी ठाम राहिलं पाहिजे. कारण जग तुम्हाला त्यानंतरच दाद देते. ज्या हिंद प्रांतावर १२५ वर्ष कोणी राज्य केलं असेल तर ते फक्त मराठ्यांनी केलं. ज्यांनी १२५ वर्ष राज्य केलं, त्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण जपायची नाही तर कोणी जपायची? आता कार्यक्रमाच्या आधी उदय सामंत यांनी मला सांगितलं की मराठी भाषेसाठी तुम्ही जे सांगताल त्यासाठी आम्ही मदत करू. ते मदत करतील अशी अपेक्षा आहे, राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
हिमाचल प्रदेश मध्ये तुम्ही जर गेला तर तिथे तुम्हाला भारतीय असून सुद्धा जमीन विकत घेता येत नाही पण आमच्याकडे तुम्ही या. आमची जमीन घेऊन जा, असे आहे. तुमचे अस्तित्व टिकले नाही तर भाषा कधी टिकेल. मराठी माणसाने अस्तित्व टिकविले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
राज ठाकरे म्हणाले, तुमच्या मनात आलं असेल की मी या ठिकाणी कसा? हा शासनाचा कार्यक्रम आहे. पण मला उदय सामंत यांनी या कार्यक्रमासाठी बोलावलं. त्यामुळे मला तुमचं सर्वांचं दर्शन झालं. त्यासाठी मी उदय सामंत यांचे आभार मानतो. माझे मित्र अभिनेता रितेश देशमुख यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. हे सर्व भाग्यवान माणसं, मी पुरस्कार दिला म्हणून नाही. पण यांना (अभिनेत्यांना) पुरस्कार मिळतात आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो. तिरस्कार घेऊन आम्हाला पुढे वाटचाल करावी लागते.
साहित्यिकांनी विनंती आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले, तुम्ही मार्ग दाखवायला पाहिजे. पूर्वी साहित्यिक राजकीय मत मांडायचे. आता मला ते दिसत नाही, चांगलं काय वाईट काय समाजाला सांगितलं पाहिजे
तरुणांना आवाहन करताना राज ठाकरे म्हणावे, तरुणाईने साहित्य वाचले पाहिजे. त्यातून बोध घेतला पाहिजे. संमेलनातून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा १० पुस्तकं जाऊन आणली पाहिजे. जिथे जिथे मराठी, महाराष्ट्र जपता येईल तिथे ते जपा. रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत एक चित्रपट घेऊन येतायत. आता संभाजी महाराज यांच्यावर नवीन चित्रपट येतोय. आपल्या महापुरुषांना जातीपाती मध्ये अडकवने नाही पाहिजे. प्रत्येक महापुरुष आपलाच पाहिजे. जातीपातीतून महाराष्ट्र बाहेर येण्याची गरज आहे.
Marathi language, don’t register crime, appeals Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- DeepSeek अमेरिकन संसदेची चिनी AI डीपसीकच्या वापरावर बंदी; फोन-कॉम्प्युटरवरही इन्स्टॉल करण्यास मनाई
- Ajit Pawar तुमची भावकी टक्केवारी घेऊन पैसे खाते, अजित पवारांकडेच थेट तक्रार
- Chhattisgarh : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये १० नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण!
- Aadhaar card : महाराष्ट्र सरकारने प्रत्येक नाविकासाठी QR कोड असलेले आधार कार्ड केले अनिवार्य