3 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मोठी भेट दिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात होती. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने आज सर्वात मोठा निर्णय जाहीर केला असल्याचं बोललं जात आहे. यानंतर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले, मराठी ही केवळ समृद्ध साहित्य घडवणारी भाषा नाही, तर तिने सदैव स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची प्रेरणा देखील दिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा निर्णय आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने मराठी भाषिक भगिनी आणि बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, एवढ्या जगात माय मानतो मराठी! धन्यवाद आदरणीय मोदीजी! माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. समस्त मराठी भाषकांतर्फे मी आपले मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या समर्थ पाठबळमुळे हे शक्य झाले. अभिजात दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची मागणी न्याय्य होती हे आता जगाला पटेल. मोदीजी, आपण माय मराठीचे पांग फेडले आहेत! पुन्हा एकवार धन्यवाद!
उपमुख्यमंत्री फडणीस म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, मी, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने अत्यानंद व्यक्त केला. जो विषय इतके वर्ष प्रलंबित होता, त्याला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार व्यक्त करणारा ठराव करण्यात आला. 3 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतला. संपूर्ण महाराष्ट्राचे आणि जगभरातील मराठीजनांचे खूप खूप अभिनंदन!
Marathi classic quality Special reaction of Modi Shah and Shinde-Fadnavis, said..
महत्वाच्या बातम्या
- ‘…त्यातील एका मागणीची आज पूर्तता झाली’ ; राज ठाकरेंची विशेष प्रतिक्रिया
- Marathi : मोदी सरकारने मराठीला दिला अभिजात भाषेचा दर्जा; पण तो काँग्रेसला मात्र टोचला!!
- Karnataka : कर्नाटकचे आरोग्यमंत्री अडचणीत, सावरकरांचे नातू करणार मानहानीचा दावा
- Siddaramaiahs : सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढल्या; आता MUDA प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा आरोप!