विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंतरवली सराटीत मराठा समाजाची अतिविशाल सभा घेऊन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा एल्गार केला. त्या सभेत त्यांनी रॅम्प वॉक करत एन्ट्री घेतली, त्यातून त्यांच्या मराठा समाजातल्या नेतृत्वाचे दमदार पाऊल राजकीय क्षेत्रात पडले आणि त्याचवेळी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या प्रस्थापित मराठा नेतृत्वाला गंभीर आव्हान दिले गेले. Manoj jarange patil targets shinde – fadnavis – ajit pawar – bhujbal and sadavarte; but politically challenges established maratha leadership in maharashtra
मनोज जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीत अतिप्रचंड सभा घेऊन मराठा आरक्षणाचा एल्गार केला. ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण द्या, ही मूळची भूमिका त्यांनी काहीशी बदलली आणि 50 टक्क्यांबाहेर जाऊन आरक्षण दिले तरी चालेल, पण ते टिकणारे आरक्षण द्या, अशी आग्रही मागणी केली. त्याचवेळी त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारलाही टार्गेट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ एकाच बाजारातले आहेत. लोकांना त्यांचे खरे रूप माहिती आहे, असे सांगून जरांगे पाटलांनी टोकदार राजकीय भाष्यही केले, पण त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे घेऊन त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणाऱ्या गुणवंत सदावर्तेंना आवरावे. मराठ्यांना अंगावर घेऊ नये, असे प्रतिआव्हान दिले. छगन भुजबळ आणि गुणवंत सदावर्ते यांचावरचा प्रचंड राग मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. भुजबळ आणि सदावर्ते त्यांनी तोंड बंद ठेवावे अन्यथा मराठ्यांची ताकद त्यांनाही दाखवून देऊ, असे ते म्हणाले.
मराठा समाजातला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यातले भुजबळ हे मोठे अडथळा ठरतात, याची जाणीव झाल्यानंतर जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना टार्गेटवर ठेवले, हे खरे, पण यामध्ये सध्याचे भुजबळांचे शरदनिष्ठ राष्ट्रवादी बरोबरचे असलेले विशिष्ट तणावाचे संबंध आणि विशिष्ट वाद याची पार्श्वभूमी आहे. म्हणूनच जरांगे पाटलांनी शिंदे – फडणवीस यांच्या बरोबरच अजित पवार यांनाही इशारा दिला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री भुजबळ आणि सदावर्तेंना मुद्दाम उचकवत आहेत. त्यामुळे ते मराठ्यांविरोधात भाषा वापरत आहेत, पण मराठा समाजानेच भाजपला 106 आमदार निवडून दिले, हे विसरू नये. मराठा समाजाने तुमचे सरकार आणले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना पण समज द्यावी, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.
जरांगे पाटलांच्या संपूर्ण भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, छगन भुजबळ आणि गुणवंत सदावर्ते हेच टार्गेटवर राहिले. पण मराठा आरक्षणाच्या विषयाच्या इतिहासात नेमके कोणी काय केले??, याविषयी त्यांनी भाष्य केले नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांची नावे त्यांनी घेतली नाहीत. फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात हायकोर्टापर्यंत टिकलेले मराठा आरक्षण ठाकरे – पवार सरकारच्या काळात गेले. सुप्रीम कोर्टात ते टिकू शकले नाही, याविषयी जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात कोणताही संदर्भ दिला नाही.
प्रस्थापित मराठा नेतृत्वाला आव्हान
पण त्यापलीकडे जाऊन जरांगे पाटलांच्या आजच्या सभेतून एक महत्त्वाचा राजकीय संदेश बाहेर गेला, तो म्हणजे जरांगे पाटलांसारख्या मराठवाड्यातल्या एका सर्वसामान्य कुटुंबातून समोर पुढे आलेल्या एका व्यक्तीचे नेतृत्व मराठा समाजातून समोर आले आणि ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या प्रस्थापित मराठा नेतृत्वाला आव्हान देणारे ठरले आहे.
आत्तापर्यंत मराठा समाजाचे 52 मोर्चे निघाले, पण त्या मोर्चांना कोणत्याही चेहऱ्याचे नेतृत्व नव्हते. अंतरवली सराटीच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचे चेहऱ्याचे नेतृत्व समोर आले. आत्तापर्यंत कोणत्याच प्रस्थापित मराठा नेत्याने कोणत्याही मुद्द्यावर एवढी मोठी सभा घेतल्याचे उदाहरण नाही, त्यामुळेच जरांगे पाटलांनी जरी शिंदे – फडणवीस – अजितदादा, भुजबळ आणि सदावर्ते यांना त्यांची नावे घेऊन टार्गेट केले असले, तरी प्रत्यक्षात जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातल्या प्रस्थापित मराठा नेतृत्वापुढेच खरे आव्हान उभे केले आहे!!, हेच अंतरवली सराटीतल्या गरजवंत मराठा आरक्षण सभेचे राजकीय इंगित आहे.
Manoj jarange patil targets shinde – fadnavis – ajit pawar – bhujbal and sadavarte; but politically challenges established maratha leadership in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- वेगवेगळ्या गोटातून लढून “पवार केंद्रित” ट्रिपल डिजिट आकडा गाठायचा राष्ट्रवादीचा डाव आहे का??
- ”आरोप करा, पण निव्वळ राजकारणासाठी…” शरद पवारांच्या टिप्पणीवर शेलारांकडून प्रत्युत्तर!
- मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने किरेन रिजिजू आणि अनिल अँटनी यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी
- तेलंगणा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका, माजी प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा