विशेष प्रतिनिधी
जालना : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शनिवार, २४ फेब्रुवारीपासून राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. परंतु शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलन शांततेत पार पडण्याची हमी मागितल्यानंतर जरांगेंनी आंदोलनाचे स्वरूप बदलले असून फक्त शनिवारी सकाळी ११ ते १ या वेळेत रास्ता रोको केला जाणार आहे. तर रविवार, २५ फेब्रुवारीपासून गावोगावी धरणे आंदोलन करण्याची हाक दिली आहे. रविवारीच आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक होईल.Manoj Jarange On High Court Appeal, Maratha Reservation Protest, Antarwali Sarati Jalna
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाच्या स्वरूपात झालेल्या बदलाची माहिती दिली. यात दररोज शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने दिली जाणार आहेत. कुणी निवेदने घ्यायला आले नाही तर रास्ता रोको केला जाणार आहे.
इनसाइड स्टोरी जरांगेंचा सामाजिक भावनेला हात
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन शांततेत पार पडेल असा शब्द द्यावा असे न्यायालयाने सांगितले. यासंदर्भात जरांगे पाटलांनी २६ तारखेपूर्वी भूमिका जाहीर करावी, असे निर्देश न्यायालयाने शुक्रवारी दिले. परंतु, हे निर्देश आपल्यापर्यंत आलेच नाहीत, असा दावा जरांगे पाटलांनी केला आहे. आंदोलनाची दिशा बदलताना त्यांनी सामाजिक भावनेला हात घातला. आंदोलनामुळे मराठा समाजाकडून नाही, परंतु इतर काही लोकांकडून विद्यार्थिनींना त्रास होण्याची भीती होती.असे जरांगे पाटलांनी सांगितले. त्यातच २५ रोजी संत रविदास महाराजांची जयंती आहे. परंतु आंदोलन लक्षात घेता काही ठिकाणी संत रविदास महाराज जयंतीला परवानगी नाकारली. त्यामुळे आपण चर्मकार बांधवांसाठी माघार घेत असल्याचे ते म्हणाले, तसेच नाशिक येथे बंजारा समाजाचा राज्यव्यापी सामाजिक कार्यक्रम आहे. त्यामुळे बंजारा बांधवांसाठी माघार घेत असल्याचे कारण जरांगे पाटील सांगत आहेत.