नाशिक : आंदोलन आणि प्रति आंदोलनांमधून भाजपच्या विरोधात पण वातावरण पेटेना; उलट सत्तेच्या पदांसाठी पवार संस्कारित नेत्यांना भाजपचीच ओढ लागल्याचे चित्र आज दिसून आले. Manoj jarange
– मनोज जरांगे यांचे आंदोलन
एकीकडे मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटीत भर उन्हामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू केले असताना दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ढेकळात बसून आंदोलनाची घोषणा केली. मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांनी परस्पर विरोधी मागण्या केल्या. मनोज जरांगे यांनी मराठा मंत्रालयाची मागणी केली, तर लक्ष्मण हाके यांनी मराठा मंत्रालयाची मागणी अवैध ठरवली.
– लक्ष्मण हाकेंचा इशारा
मनोज जरांगे यांनी फडणवीस सरकारकडे 14 मागण्या ठेवल्या. त्यापैकी बहुतेक मागण्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य केल्या, पण तरीही मनोज जरांगे यांचे समाधान झाले नाही त्यामुळे त्यांनी अंतरवाली सराटीत भर उन्हामध्ये बाज टाकून आंदोलन सुरू केले. त्याला छेद देण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी शेतातल्या ढेकळात बसून आंदोलन करायची घोषणा केली. त्याची तारीख आणि वार उद्या सांगायची सुद्धा घोषणा केली. बाकीच्या ओबीसी आंदोलकांनी सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या ढेकळातल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकांनी काही वेळ समृद्धी महामार्ग रोखला.
– पवार संस्कारित प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश
पण या सगळ्याचा राजकीय परिणाम भाजपवर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात भाजप विरोधामध्ये कुठले राजकीय वातावरण पेटल्याचे दिसले नाही. उलट पवार संस्कारित नेत्यांना सत्तेच्या पदांसाठी भाजपचेच आकर्षण वाढल्याचे दिसून आले. राहुरीचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवारांची साथ सोडून हातात धरले. जयंत पाटलांची शिष्टाई सुद्धा या प्रकरणात कामाला आली नाही. प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी हवी असल्याने आणि नुसती उमेदवारी करण्यापेक्षा विजयाची खात्री हवी असल्याने त्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. वास्तविक शरद पवारांनी प्राजक्ता तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता, पण तो शब्द फुकाचा ठरला. कारण विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीकडे तेवढी मतेच नसल्याने प्राजक्त तनपुरे यांना भाजपचा रस्ता धरावा लागला. आपण जड अंतःकरणाने शरद पवारांना सोडत असल्याचे वक्तव्य प्राजक्त तनपुरे यांनी केले, पण त्याच वेळी शरद पवार आता आपल्याला पदे देऊ शकत नाहीत, याची अप्रत्यक्ष कबुलीच त्यांनी दिली.
– राजेश टोपेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा
दुसरीकडे मनोज जरांगे यांना टाळ्यांवर टाळ्या देऊन त्यांचे आंदोलन भडकवणारे शरद पवारांचे दुसरे अनुयायी राजेश टोपे यांच्या सुद्धा भाजपच्या प्रवेशाची चर्चा झाली. ती चर्चा बराच काळ रेंगाळल्यानंतर राजेश टोपे स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचा खुलासा केला. पण मुळात राजेश टोपे यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाल्याने त्यांच्या निष्ठेविषयी दाट संशय निर्माण झाला. राजेश टोपे विधानसभेला पराभूत झाल्यानंतर प्रचंड अस्वस्थ आहेत. हाताला काही काम नाही. पवारांच्या राष्ट्रवादीत राहून आता कुठले पद मिळायची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर त्यांच्याच गोटातून भाजप प्रवेशाची पुडी सुटली. पण राजेश टोपे यांनाच पुढे येऊन भाजप प्रवेश करणार नसल्याचा खुलासा करावा लागला.
Manoj jarange failed to create political atmosphere against BJP
महत्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासाठी जलसंधारणाच्या दिशेने मोठे पाऊल; दोन्ही ठिकाणच्या विशेष पथकाला फडणवीस सरकारची मंजुरी
- राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सत्तेच्या तुकड्यासाठी भांडणे; शिंदे सेनेचे मराठवाड्यात पक्षप्रवेश सोहळे!!
- AI च्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी सध्या सर्वोत्तम काळ आणि संधी; AI क्षेत्रात नेतृत्वासाठी महाराष्ट्र सज्ज!!- मुंबई टेक वीक २०२६ चे उद्घाटन
- Amit Shah : ‘घुसखोरांना शोधून भारताबाहेर पाठवणार’; अमित शहांचा मोठा इशारा, सीमासुरक्षेवर केंद्र सरकार अधिक आक्रमक