विशेष प्रतिनिधी
जालना : एकाच जातीवर कुणी निवडून येऊ शकत नाही याची कबुली देत मनोज जरांगे यांनी म्हणूनच आता 4 – 5 जातींचे समीकरण जुळवायची तयारी सुरू केली आहे. ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण घेण्यासाठी आग्रही असलेले मनोज जरांगे सुरुवातीला फक्त मराठा आरक्षणाची भाषा बोलत होते. काही दिवसांपूर्वीपासून त्यांनी मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिम आरक्षणाची देखील भाषा सुरू केली आणि आता त्या पाठोपाठ एकाच जातीवर कोणी निवडून येऊ शकत नाही याची कबुली देत जरांगे यांनी आणखी 4 – 5 जातींचे समीकरण जुळवायची भाषा आजच्या पत्रकार परिषदेत वापरली. Manoj jarange accepts only one caste can’t win election
29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा असं म्हणत मनोज जरांगे यांनी आज उपोषणाच्या पहिल्या दिवशी स्वतःलाच मुदतवाढ दिली. 4 – 5 जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच असून आगामी विधानसभा निवडणुकीत आपले समीकरण जुळले नाही, तर 288 पाडायचे का ठेवायचे?, हे 29 ऑगस्टला ठरवू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर मनोज जरांगे यांनी 3 – 4 वेळा उपोषण केले. सरकारने मराठा आरक्षण दिल्यानंतरही अनेकदा मागण्या बदलल्या टप्प्याटप्प्याने त्यांची भाषा आरक्षणावरून राजकीय होत ती शरद पवारांना अनुकूल ठरायला लागली. आपल्याला मराठा आरक्षणाशी देणे घेणे आहे. बाकी राजकारणाशी देणे घेणे नाही. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही घटकांची आपला काही संबंध नाही, असा सुरुवातीला दावा करणारे मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत महायुतीच्या उमेदवारांच्या पाडापाडीची भाषा केली.
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये पाचव्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. 29 ऑगस्टला बैठक घेऊन 288 आमदार पाडायचे की ठेवायचे याबाबत ठरवू, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला. यावेळी आपल्याला राज्यात मतदारसंघनिहाय तयारी करायची असल्याचे त्यांनी सांगितले.
4 – 5 जातींचे समीकरण जुळवावे लागणार
एका जातीवर कोणीच निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला समीकरण जुळवावं लागणार आहे असं मनोज जरांगे म्हणाले. समीकरण जुळले नाही तर आपल्याला उमेदवार उभे करून जमणार नाही. जो म्हणेल ओबीसीमधून तुमची मागणी पूर्ण करू त्याला निवडून आणायचं. मग पाडापाडी करावी लागेल असं म्हणत 29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. राज्यात असा एकही मतदारसंघ नाही ज्यात 50000 मराठा नाहीत. पण एका जातीवर कोणीच निवडून येऊ शकत नाही. 4 – 5 जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच असा आश्वासन त्यांनी मराठा समाजाला देत आज पासून इच्छुकांनी यायला हरकत नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
उमेदवार पसंत नसला तरी…
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला मतदारसंघनिहाय तयारी करायची आहे. यासाठी सर्व डेटा तयार करण्यासाठी सर्वांनी 14 ते 20 ऑगस्टमध्ये इच्छुक उमेदवारांनी यावं असा आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज तरंगे यांनी सर्व जाती धर्मातील इच्छुक उमेदवारांनी तसेच छोटे-मोठे पक्ष आजी-माजी सर्वांनी यावे. गावागावातून माहिती घ्या, उमेदवार पसंत नसला तरी त्याला मतदान करायचं असे म्हणत राज्यातील आंदोलनाच्या वर्षपूर्ती रोजी म्हणजेच 29 ऑगस्टला बैठक घेऊन 288 आमदार पाडायचे की ठेवायचे याबाबत ठरवू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला.
सरकारने मराठ्यांना धोका दिल्याने पुन्हा एकदा उपोषणाची वेळ आली आहे. समाजासाठी मी आमरण उपोषण करत आहे. समाजाचे फक्त मी एवढंच ऐकत नाही. समाज मला आमरण उपोषण करू नका, असे म्हणत होता. सगेसोयरेची अंमलबजावणी करा, गुन्हे मागे घ्या, तीनही गॅझेट लागू करा. आरक्षण द्यायचे असेल तर बहाण्याची सरकारला गरज नाही. मराठा समाजाच्या मुलांना नोकरभरती, ऍडमिशनमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. Ews सुरू ठेवावे. Ecbc आणि कुणबी हे तीनही प्रमाणपत्र सुरू ठेवावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.