विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रात आज सायंकाळी ८.०० पासून कलम १४४ संचारबंदी – लॉकडाऊन सुरू झाल्यावर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी नागरिकांना गंभीर इशारा दिला आहे… नियमात राहिलात तर लाठीची भीती नाही…, पण… संचारबंदी आणि निर्बंधांच्या पालनासाठी पोलीस तयार राहतील, असे संजय पांडे पत्रकार परिषदेत सांगितले. Maharashtralockdown news 2021, DIG sanjay pande warns public to follow the rules
संजय पांडे यांनी पोलीस दलाची भूमिका स्पष्ट केली. जोपर्यंत नियमांचे उल्लंघन होत नाही, तोपर्यंत लाठीचा वापर होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले. सार्वजनिक मालमत्तेची हानी कोणी करीत असल्याचे दिसल्यास मात्र नाईलाजाने पोलीसांना बळाचा वापर करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करवून घेण्यासाठी पोलीस दल तयार आहे. नागरिकांना नियम पाळावेच लागतील. त्यातून सूट नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाची साखळी तोड़ण्यासाठी संचारबंदी आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. यात पोलीस दलावर सर्वात मोठी जबाबदारी आहे. नियमांच्या अंमलबजावणीत आम्हाला लोकांच्या सहकार्याची गरज लागणार आहे. नियम आणि अटी लोकांना आता माहिती झाले आहेत. त्यामुळेच त्याचे पालन व्हावे अशी अपेक्षा असून पोलिसांकडून नाहक कुणाला त्रास होणार नाही, याची हमी मी देतो, असेही पांडे म्हणाले.
-८१ टक्के पोलीसांचे लसीकरण पूर्ण
सर्वांनी नियमांचे पालन केले तर निश्चितपणे १५ दिवसांच्या आधीच कोरोनाचे आकडे कमी झालेले दिसतील, असा विश्वासही पांडे यांनी व्यक्त केला. पोलीस दलातील ८१ टक्के कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लसीकरण झाले असून ती आमच्यासाठी यावेळी जमेची बाजू असल्याचेही त्यांनी सांगितले. या महामारीच्या काळात डॉक्टरर्स आणि पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत, याचे भान नागरिकांनी राखावे, असे आवाहन संजय पांडे यांनी केले.