• Download App
    Maharashtra leaders विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झाले करून "म्यांव म्यांव"; आता निवडणूक प्रचारात आणले "सरडे" आणि "डायनोसॉर"!!

    विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झाले करून “म्यांव म्यांव”; आता निवडणूक प्रचारात आणले “सरडे” आणि “डायनोसॉर”!!

    नाशिक : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झाले करून “म्यांव म्यांव”; आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणले “सरडे” आणि “डायनासॉर”!!, हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष घोषणे पूर्वीचे चित्र आहे.

    मानवाला प्राणीसृष्टीशी जोडून आणि जुळवून घेण्याची आदिम आवड आहे. त्याचेच प्रतिबिंब राजकारणात पडून आपापल्या नेत्यांना “वाघ” – “सिंह” संबोधण्याची प्रथा आहे. कोण आला रे कोण आला, अमूक तमूकचा वाघ आला किंवा सिंह आला, अशा घोषणा या राजकीय अभिमानातूनच कार्यकर्ते देत असतात.

    त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय कर्तृत्वामुळे शिवसेनेची “वाघ” प्रतिमा तयार झाली, पण ती प्रतिमा आदित्य ठाकरे यांना जपता आली नाही म्हणून नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर “म्यांव म्यांव” असा मांजराचा आवाज काढून आदित्य ठाकरे यांना डिवचले होते. त्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार घामासान झाले होते.

    पण आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फक्त “मांजर” आणि “वाघ” हे दोनच प्राणी उरले नसून त्यामध्ये “सरडे” आणि “डायनोसॉर” दोन प्राण्यांचा देखील शिरकाव झाल्याचे चित्र दिसायला लागले आहे. दोनच दिवसांपूर्वी सांगली मध्ये एका कार्यक्रमात भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील हे अचानक विद्यमान खासदार विशाल पाटलांवर संतापले. सांगलीच्या राजकारणात वेळोवेळी रंग बदलणारा “सरडा” घुसला आहे, एका निवडणुकीत जिंकला तर त्याला मस्ती चढली आहे, अशी टीका करून बसले. त्यावरून सांगलीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा जोरदार वादंग माजला.

    वास्तविक “सरडे शिष्ट” किंवा “सरडे शिष्टाई” या शब्दांचा अत्यंत अश्लील अर्थ आणि गाढव – गाढवीचा दृष्टांत मराठी साहित्याच्या शब्दकोशांमध्ये दिला आहे. त्यामुळे सार्वजनिक भाषणांमध्ये ते शब्द कोणी वापरत नाहीत.

    पण महाराष्ट्रातले राजकारण फक्त “सरड्यापर्यंत” शिल्लक उरले नाही. ते त्यापुढे जाऊन “डायनोसॉर” पर्यंत येऊन ठेपले. पिंपरी चिंचवड मधले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब भोईर यांनी अजितदादांची साथ सोडताना त्यांच्या पक्षातल्या नेत्यांशी “डायनासॉरशी” तुलना केली. अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये “सरडे” पोसले गेले. त्यांचे आता “डायनासॉर” झालेत, असे टीकास्त्र भाऊसाहेब भोईर यांनी सोडले. पिंपरी चिंचवडची जनता आपली मालक आहे. त्या मालकांच्या आदेशानुसारच विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले.

    पण भाऊसाहेबांच्या या भाषणामुळे महाराष्ट्राचे राजकारण “म्यांऊ म्यांऊ” ते “डायनोसॉर” व्हाया “सरडा” असे रंगल्याचे दिसून आले.

    Maharashtra leaders brings in animals in election campaign

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक