प्रतिनिधी
पुणे : “आदिपुरुष” सिनेमा वरून सोशल मीडियात महाभारत सुरू असताना दिग्दर्शक ओम राऊत यावर सगळीकडून शरसंधान साधले जात आहे. ओम राऊतला ट्रोल करताना अनेकांनी ताळतंत्र सोडले आहे. ओम राऊतच्या बाजूने लिहिणाऱ्यांना देखील घाणेरड्या भाषेत ट्रोल केले जात आहे.Mahabharata from ‘Adipurush’: Famous warrior writer Shefali Vaidya hurt by dirty trolling!!
यामध्ये लेखिका शेफाली वैद्य यांनी ओम राऊत याला संधी द्यायला हरकत नाही, अशा आशयाचे ट्विट केले होते. मात्र या ट्वीट वरून शेफाली वैद्य यांना हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांनी देखील ट्रोल केले आहे. त्यामुळे त्या मनोमन दुखावल्या आहेत. फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आपले मन मोकळे केले आहे.
ते असे :
आदिपुरुषच्या निमित्ताने…
बहुचर्चित असा आदिपुरुष चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर रान पेटलं. बहुसंख्य दर्शकांना चित्रपट अजिबात आवडलेला नाही हे दिसतंच आहे. चित्रपटावर, त्याच्या दिग्दर्शकावर आणि लेखकावर अत्यंत कडक शब्दात टीका झालेली आहे. चित्रपट न आवडण्याचा, त्यावर टीका करण्याचा हक्क सर्वांनाच आहे पण ह्या निमित्ताने चित्रपटाविषयी जराही वेगळा विचार मांडू पाहणाऱ्या सर्वच लोकांना ’विकाऊ’, ‘हिंदूद्वेष्टे’ वगैरे विशेषणे लावून ज्या पद्धतीने ट्रोल केलं जातंय ते फार भयानक आहे. ह्या मॉब लिंचिंगमुळे रामायण महाभारत अश्या विषयांना यापुढे कोणीही निर्माता-दिग्दर्शक हात घालू धजणार नाही, त्याचा हेतू कितीही चांगला असला तरीही.
माझ्यापुरतं सांगायचं तर मी हा चित्रपट अजून पाहिला नाही. पण त्याचा सात जूनला रिलीज झालेला ट्रेलर मी पाहिला होता आणि त्यात तरी मला काहीही आक्षेपार्ह वाटलं नव्हतं. हां, ट्रीटमेंट जरूर वेगळी वाटत होती, आणि ओम राऊतच्या वैचारिक लिनींगबद्दल मला शंका नव्हती म्हणून मी ’ह्या चित्रपटाला एक चान्स द्यायला हरकत नाही’ अश्या स्वरूपाचे एक ट्विट केले होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर जो टीकेचा भडीमार झाला त्यात ह्या ट्विटसाठी माझ्यावरही खूप टीका झाली. हरकत नाही. मी टीकेला कधीच घाबरत नव्हते, घाबरत नाही आणि घाबरणारही नाही. पण ज्या पद्धतीने ’पेड ट्विट’ म्हणून मला ट्रोल केलं गेलं, ‘हिंदूद्वेष्टी’ म्हणून कॅन्सल करण्यात आलं ते फार दुःखदायक होतं.
बरं, मला हिंदू म्हणून कॅन्सल करणारे हे लोक डाव्या विचारांचे किंवा मुल्ले वगैरे नाहीयेत. त्या लोकांच्या ट्रोलिंगचं, अगदी धमक्यांचं सुद्धा मला काहीच वाटत नाही. ते तसं असणार हे मी गृहीत धरलंय. पण मला ट्रोल करण्यात काही स्वघोषित हिंदुत्ववादी वॉरियर्स सर्वात पुढे होते याचं मला वाईट वाटतंय. ह्यातल्या काही लोकांना माझं आजवरचं ग्राउंडवरचं काम माहित आहे, मी मदत केलेल्या हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या संस्था माहिती आहेत. त्यातल्या काहींना त्यांच्या पुस्तक प्रमोशनासाठी, कुणाला सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी, तर कुणाला नोकरीसाठी मी वेळोवेळी मदत केलेली आहे. त्या लोकांनी केवळ एका ट्विटवरून माझ्यावर जी गरळ ओकली ती व्यथित करणारी होती.
ह्यातले बहुसंख्य लोक हे फक्त फेसबुक आणि ट्विटर वॉरियर्स आहेत हे मलाही माहिती आहे. त्यांचं ग्राउंडवर काहीही काम नाही. तरीही हे वाचाळवीर सोशल मीडियावरून प्रत्येकाला हिंदुत्वाची सर्टिफिकेटं वाटत फिरतात. ह्यातल्या काहींसाठी मी तर सोडुनच द्या, पण कोणीच हिंदू नाहीये. लाखो लोकांना कन्व्हर्शन पासून वाचवणारे सद्गुरू जग्गी वासुदेव त्यांच्यासाठी हिंदू नाहीयेत, संघाचे मोहन भागवत त्यांच्यासाठी हिंदू नाहीयेत. ज्यांच्या कार्यकालात राममंदिर साकार झालं ते मोदी सुद्धा त्यांच्यासाठी हिंदू नाहीयेत, मग मी तर किस पेड की पत्ती?
पण ह्या इतक्या भयंकर ट्रोलिंगचा परिणाम काय होऊ शकतो ह्याचा कोणी विचार केलाय का? आदिपुरुष हा चित्रपट बहुसंख्य लोक म्हणतात तसा अतिटुकार असेल, पण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ओम राऊतला ज्या भयानक पद्धतीने ट्रोल केलं जातंय ते पाहता कुठला तरुण दिग्दर्शक आपल्या बाजूने विचार करू धजेल? त्यापेक्षा ते डाव्या बाजूला जाणं पसंत करतील, आणि पठाण सारखे तद्दन हिंदू आणि भारत द्वेष्टे सिनेमे बनवतील.
सोशल मीडिया हे माध्यम तसं मॉब लिंचिंगला अनुकूल असंच आहे. इथे आपली खरी आयडेंटिटी उघड न करता किंवा स्वतःचे प्रोफाईल लॉक ठेवून अनेक भ्याड लोक स्वतःचा कंडू शमवून घेतात. स्वतःची ओळख लपवली की हव्या त्या अश्लाघ्य भाषेत टीका करता येते, शिवीगाळ करता येते, स्वतःचे फेक शौर्य फेक आयडी मागे दडून दाखवता येते म्हणून इथे भ्याड लोकांची खूप चलती आहे. दुर्दैवाने उद्या हिंदुत्वासाठी प्रत्यक्ष काहीही कृती करायची वेळ आली तर ह्यातले सर्व शेपूटघालू लोक घरात दडून बसतील पण मॉब लिंचिंग मध्ये हे सर्वात पुढे.
ह्या आदिपुरुष प्रकरणाने मला खूप शिकवलं. त्या तिसरी कसम चित्रपटातल्या राज कपूरसारख्या माझ्या ह्या तीन कसमा, ह्या पूर्ण एपिसोडनंतरच्या,
१) आधी स्वतः पाहिल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय फक्त ट्रेलरच्या आधारावर किंवा कुणाच्या शब्दावर विसंबून कुठलाही चित्रपट, पुस्तक किंवा पॉडकास्ट एंडॉर्स करायचं नाही.
२) माझा सहज स्वभाव हा पुढच्या माणसावर चटकन विश्वास टाकणारा आहे पण ह्यापुढे कोणालाही मदत करताना दहा वेळा विचार नक्कीच करीन. इतकी मदत करून सुद्धा कृतघ्न असलेले हलकट लोक ह्या निमित्ताने इतके पाहिले की मन उबगून गेलंय.
३) मी काम करतेय ते देव, देश आणि धर्म ह्या त्रयींसाठी, हे नेहमी लक्षात ठेवायचं, म्हणजे कुणाच्या कॅन्सल करण्याचा काहीही परिणाम होत नाही.
शेफाली वैद्य
Mahabharata from ‘Adipurush’: Famous warrior writer Shefali Vaidya hurt by dirty trolling!!
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात टळला! लष्कराने ११ जिवंत बॉम्बसह ६१ स्फोटके केली नष्ट
- आधी पक्षातून हकालपट्टी नंतर अटकही, ‘द्रमुक’च्या प्रवक्त्याला भाजपा नेत्या खुशबू सुंदरवर केलेली वादग्रस्त टिप्पणी भोवली!
- घरात बसणार्यांना मोदी-शाह काय कळणार? अकोल्यात फडणवीसांची बोचरी टीका
- ‘’अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे?’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना सवाल!