विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे अजितदादा म्हणाले, काम करू दर्जेदार; तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनी नागपूर कार्यालयात उडविला लावणीचा बार!!, असला प्रकार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून समोर आला. Lavni at NCP Nagpur office
अजित पवारांनी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी येथे शाहीर साबळे स्मारकाला भेट दिली या सगळ्या कार्यक्रमाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला. आपल्या दर्जेदार कामगिरीने लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावे अशी कामं आपण करू. माणसाला माणुसकीने जोडू आणि पुढे जात राहू!!, असा उच्च दर्जाचा संदेश अजित पवारांनी त्यातून दिला.
पण त्याच वेळी प्रसार माध्यमांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नागपूर कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी लावणीचा बार उडविल्याच्या बातम्या आल्या. अजित पवार यांनी नागपूर मध्ये याच कार्यालयाचे दोन महिन्यापूर्वी उद्घाटन केले होते तिथे दिवाळी मिलन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष शिल्पा शाहीर यांनी अजित पवार + प्रफुल्ल पटेल + सुनील तटकरे या बड्या नेत्यांच्या पोस्टर पुढे मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा!!
या लावणीचा बार उडविला. त्यावेळी तिथे हजर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना वन्स मोअर दिला. त्या सगळ्या लावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस टीकेचा भडीमार झाला पण अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी लावणीचा बार उडवण्याचे समर्थन केले. दिवाळी मिलन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने लावणी सादर केली त्यात काही चूक नाही, असा दावा त्यांनी केला.
एकीकडे त्यांच्याच पक्षाचे मुख्य दर्जेदार काम करायला सांगत होते आणि त्याचवेळी दिवाळी मिलन कार्यक्रमात त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते लावणीचा बार उडवत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची “पवार संस्कारित संस्कृती” महाराष्ट्र समोर उघड्यावर आली.