प्रतिनिधी
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत मतदानातून मधून कोणाच्या सत्तेचे दिवे लागतील ते माहिती नाही, पण त्याआधी शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि मनसे मध्ये आकाशात कंदील वॉर रंगले आहे.Lantern war in Shiv Sena-MNS
२०२२ ला महापालिकेची निवडणूक असल्याने या कंदिलबाजीला आणि विद्युत रोषणाईला वेगळे महत्व असून एकप्रकारे आगामी निवडणुकीत शिवसेना आणि मनसे आक्रमक झालेली पहायला मिळत आहे.
एरवी प्रत्येक दिवाळीत मनसेकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये विद्युत रोषणाई केली जाते. परंतु यंदा मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनेही मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करत शिवाजी पार्कसह सेना भवनाच्या आसपासचा परिसर उजळून टाकला आहे. त्यातच आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वीची ही शेवटची दिवाळी असल्याने ‘दादरचा भगवा आमचाच’, हे सिद्ध करण्यासाठी दादर – शिवाजी पार्कमध्ये सध्या मनसे आणि शिवसेना यांच्यात जोरदार कंदिल ‘वॉर’ सुरू झाले आहे. या रोषणाईचा प्रकाश मतदार येत्या निवडणुकीत कुठल्या पक्षावर पाडणार, हे येणारी निवडणूकच सांगू शकेल.
शिवसेना भवनाच्या परिसरात दरवर्षी दिवाळीत कंदिल लावण्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये चढाओढ सुरू असते. दरवर्षी या कंदिलावरून वाद-विवादही निर्माण होत असतात. बऱ्याच वेळा मनसेकडून सर्वात प्रथम कंदिल लावून जागा अडवली जायची. आणि बऱ्याचवेळा लहानपण घेत मनसेने शिवसेनेला कंदिल लावण्यास जागाही उपलब्ध करून दिली आहे. मात्र, यावर पर्याय म्हणून शिवसेना भवनासमोर माहिमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकात शिवसेना आणि शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर मनसेने कंदिल लावावा, असे ठरले.
परंतु यंदा शिवसेना विभागप्रमुख, आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना भवन परिसरातच सहा कंदिल लावले आहेत, तर मनसेने दोन कंदिल लावले आहेत. तर शिवाजी पार्क मैदानाकडे जाणाऱ्या मार्गावरही शिवसेनेने तीन ते चार कंदिल लावले आहेत. याच मार्गावर मनसेनेही आपले कंदिल लावून जनतेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच भाजपनेही आपला कंदिल लावत या दोन्ही पक्षांच्या युध्दात स्वत:लाही झोकून दिले आहे. शिवसेना भवनासह वीर सावरकर मार्गावरही कंदिल युध्द पाहायला मिळत आहे. या मार्गावर शिवसेना, मनसे आणि भाजपचे कंदिलही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
याशिवाय दरवर्षी शिवाजी पार्क मैदान परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने विद्युत रोषणाई केली जाते. परंतु यंदा मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून शिवाजी पार्क मैदानाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या बाजूस कायमस्वरूपी विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे मनसेनेही एक पाऊल पुढे टाकत दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक आकर्षक रोषणाई करत माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळ्यापासून ते शिवसेना भवन चौकापर्यंत वेगळ्याप्रकारे रोषणाई करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरवर्षी या मार्गावर झाडांवर विद्युत रोषणाई केली जाते, तर यंदा संपूर्ण रस्त्याच्यावरील बाजुस विद्युत दिव्यांच्या माळा लावून वेगळ्याप्रकारची रोषणाई करत हा परिसर मनसेने तेजोमय करून टाकला आहे.
– शिवसेनेचे १५० कंदिल
शिवसेनेचे विभागप्रमुख व आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क परिसरातच दहा ते बारा कंदिल लावले आहेत. परंतु या संपूर्ण विधानसभेत सुमारे १५० अशा प्रकारे कंदिल लावण्यात आल्याची माहिती शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी दिली आहे. आम्ही स्पर्धेकरता कंदिल लावलेले नाहीत, तर दरवर्षी आम्ही एवढे कंदिल लावत असतो आणि विभागातील जनतेला हे ज्ञात असल्याचे सरवणकर यांनी स्पष्ट केले.
मनसेचे १०० कंदिल
शिवसेना शाखाध्यक्ष संतोष साळी यांच्या विभागात मनसेने दहा कंदिल लावले असून शिवसेना भवनासमोर पहिला कंदिल हा त्यांनी लावला आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, संपूर्ण मुंबईत पहिला कंदिल आपला असून तो शिवसेना भवनासमोर आणि कृष्णकुंजबाहेर लावल्याचा दावा संतोष साळी यांनी केला आहे. अशा प्रकारे विभागात मनसेने १०० हून अधिक कंदिल लावले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील वर्षी कोविडमुळे या राजकीय पक्षांना कंदिल आणि विद्युत रोषणाई करता आली नव्हती. परंतु आता कोविड नियंत्रणात येत आहे, त्यातच २०२२ ला महापालिकेची निवडणूक असल्याने या कंदिलबाजीला आणि विद्युत रोषणाईला वेगळे महत्व असून एकप्रकारे आगामी निवडणुकीत शिवसेना आणि मनसे आक्रमक झालेली पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या या गडावर भगवा फडकवण्याची जोरदार तयारी असल्याचे या कंदिलाच्या माध्यमातून मनसेने दाखवून दिले आहे.
Lantern war in Shiv Sena-MNS
महत्त्वाच्या बातम्या