विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ladki Bahin Yojana राज्यातील लाडक्या बहिणींसाठी येत्या काही दिवसांत मोठी खुशखबर मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर जोर धरू लागला आहे. देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीची मोठी भेट, अशा आशयाचे पोस्टर सध्या व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या पोस्टरमध्ये 14 जानेवारीपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होतील, असा ठाम दावा करण्यात आला आहे. मात्र, या पोस्टरमुळे केवळ अपेक्षा वाढल्या नसून, राज्यातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे.Ladki Bahin Yojana
विशेष म्हणजे, राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या अगदी आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला मकरसंक्रांत साजरी होत आहे. अशा वेळी सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेले हे पोस्टर आणि त्यामधील आर्थिक लाभाचे आश्वासन यामुळे निवडणूक आचारसंहितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महायुतीतील दोन घटकपक्षांच्या काही उमेदवारांकडून त्यांच्या अधिकृत तसेच वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवरून लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा होणार असल्याचे दावे उघडपणे केले जात आहेत. त्यामुळे सरकारकडून मकरसंक्रांतीच्या दिवशी किंवा त्याआधी निधी वितरित झाला, तर तो आचारसंहितेचा भंग ठरणार नाही का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.Ladki Bahin Yojana
या वादाच्या केंद्रस्थानी आलेले पोस्टर मुंबईतील वॉर्ड क्रमांक 2 मधून भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या पोस्टमध्ये मकरसंक्रांतीच्या सणाशी जोडून सरकारच्या योजनेचे श्रेय घेतले गेले आहे. सण उत्साहाचा, क्षण मकरसंक्रांतीचा. मकरसंक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे, असे नमूद करत त्यांनी पुढे स्पष्टपणे लिहिले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच 3000 रुपये 14 जानेवारीपूर्वी सर्व पात्र भगिनींच्या खात्यात जमा होणार आहेत. या पोस्टमधून सरकारने बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवले, असा दावा देखील करण्यात आला आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी केवळ सोशल मीडियापुरतेच नव्हे, तर प्रचारादरम्यानही मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3 हजार रुपये जमा होतील, असा शब्द दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा केवळ माहितीपर संदेश आहे की थेट निवडणूक प्रचाराचा भाग आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे सरकारी योजनेचा उल्लेख करत आर्थिक लाभाचे ठोस आश्वासन दिले जात असल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘लाडकी बहीण’ योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर महिला मतदार महायुतीकडे वळल्याचे मानले जाते. त्याच पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून या योजनेचा प्रचार अधिक आक्रमकपणे केला जात असल्याचे चित्र आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना आतापर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, मात्र डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांच्या हप्त्याची लाभार्थी महिला अजूनही प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता मिळणार, या चर्चेला आधीपासूनच हवा मिळत होती.
14 जानेवारीला मकरसंक्रांत आणि 15 जानेवारीला थेट मतदान अशी वेळ जुळून आल्याने या निधी वितरणाच्या चर्चेला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी किंवा त्याआधी रक्कम जमा झाली, तर त्याचा थेट फायदा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना होणार नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषतः सोशल मीडियावरून उमेदवारच जर अशा स्वरूपाचे दावे करत असतील, तर निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी सोशल मीडियावरील पोस्टर, उमेदवारांचे दावे आणि निवडणुकीची वेळ यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. लाडक्या बहिणींना मिळणारी आर्थिक मदत ही कल्याणकारी योजना आहे की निवडणूक डावपेच, हा प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 14 जानेवारीपूर्वी खरोखरच लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होतात की नाही, आणि झालेच तर त्यावर आचारसंहितेच्या उल्लंघनाची कारवाई होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तोपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजनेभोवती फिरणारी ही चर्चा राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
Ladki Bahin Yojana: Will Beneficiaries Get ₹3,000 Before Makar Sankranti 2026? PHOTOS VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- Iran Army Chief : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणच्या लष्करप्रमुखांचा लष्करी कारवाईचा इशारा; म्हणाले- शत्रूंना प्रत्युत्तर देऊ
- High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत
- महाराष्ट्रात निवडणुका महापालिकांच्या; पण पवारांच्या पासून हिजाब पर्यंत पंतप्रधान पदाची चर्चा!!
- विलासरावांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने, पण अजितदादांनी श्रेय दिले शरद पवारांना; पण ते सत्य किती??