विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : महायुतीच्या शिंदे – फडणवीस सरकारची सुपरहिट ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बदलापुरातल्या मुलींवरच्या अत्याचार प्रकरणातून झाकोळली. मुलींवरच्या अत्याचाराच्या प्रकरणाची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेऊन पोलीस आणि शाळा प्रशासनावर अक्षरशः चाबूक ओढले. पण त्यावरून जास्त राजकारण सुरू झाले. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरले त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी नेहमीची शेरेबाजी केली.
या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाडक्या बहिणीचा कार्यक्रम झाला. पण या कार्यक्रमात चर्चा मात्र रंगली, ती कोल्हापुरात महायुतीला झालेल्या डॅमेजची. लाडकी बहीण कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, कोल्हापूर जिल्ह्यातले महायुतीचे बाकीचे नेते हजर होते. पण त्यांच्याविषयी चर्चा रंगण्यापेक्षा, चर्चा रंगली, ती कोण हजर राहिले नाही याची!!
लाडकी बहीण कार्यक्रमाला समरजित सिंह घाटगे, राहुल देसाई, ए. वाय. पाटील कोल्हापुरातले महत्त्वाचे नेते हजर राहिले नाहीत. कारण त्यांना महायुतीवर नाराज होऊन स्वतःचा स्वतंत्र मार्ग चोखाळावा लागला. महायुतीचे कुठलेच नेते त्यांचे राजकीय समाधान करू शकले नाहीत. भाजपच्या शिष्टमंडळाने काल खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली समरजित सिंह घाटगे यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना कथितपणे विधान परिषदेची ऑफर दिली, पण ती त्यांनी मान्य केली नाही.
उलट कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे म्हणजेच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे भाजपची सगळी शिष्टाई समरजित सिंह घाटगे यांना पटवण्यात अयशस्वी झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांतदादा पाटील वगैरे भाजपचे नेते आपल्या महत्त्वाच्या नेत्याला बाजूला करून व्यासपीठावर बसले. त्यामुळे महायुतीचे सगळ्यात मोठे डॅमेज भाजपलाच झाल्याची चर्चा कोल्हापुरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात रंगली. अजितदादांच्या पक्षाचे नेते ए. वाय. पाटीलही त्यांना सोडून गेले. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीचे नुकसान झाले. अजितदादा ए. वाय. पाटलांशिवाय व्यासपीठावर बसले होते.
– डॅमेजवर भाजपचे नेते कंट्रोल करणार कधी??
मुंबई किंवा दिल्लीत बसून नेते आपापसांत युती किंवा आघाडी करतात. परंतु त्याचा तोटा जिल्हा किंवा तालुका पातळीवरच्या नेत्यांना सहन करावा लागतो. त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊन त्यांना नव्या वाटा चोखाळाव्या लागतात, हे चित्र कोल्हापुरात दिसले. किंबहुना भाजपने स्वतःच्या विस्तारासाठी इतर पक्षांमध्ये नेते घेतले. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. परंतु प्रत्यक्षात बाहेरून पक्षात घेतलेल्या नेत्यांना त्यांना अपेक्षित असलेल्या राजकीय लाभ देण्यामध्ये भाजप कमी पडला. त्यातून भाजप आणि महायुती फुटण्याचा धोका पत्करावा लागला. कोल्हापुरातल्या लाडकी बहीण कार्यक्रमात याचेच प्रतिबिंब पडले होते. त्यामुळे कोल्हापुरात भाजप आणि महायुतीला डॅमेज तर झाले आहे खरे, पण आता भाजपचे नेते त्यावर कंट्रोल करणार तरी कधी?? याची चर्चा भाजप अंतर्गत वर्तुळात सुरू झाली आहे.
Kolhapur Ladki Bahin Yojna Programe
महत्वाच्या बातम्या
- Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट, 15 ठार, 40 जखमी
- Lakda shetkari Yojana : लाडक्या बहिणींच्या पाठोपाठ महाराष्ट्रात लाडका शेतकरी योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा!!
- Madhya Pradesh : ‘या’ राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये झाला बदल!
- Champai Soren : चंपाई सोरेन यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची केली घोषणा!