नाशिक : अयोध्येतील बाबरी मशिदी विरुद्धच्या संघर्ष काळात राम मंदिराला विरोध आणि आता राम मंदिर बनताच “प्रॉपर्टी” आणि “बापाच्या जहागिरीची” भाषा, अशी अवस्था शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांची झाली आहे.Jitendra awhad targets BJP over ram temple inauguration
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी घेतली होती, पण त्यावेळी उद्धव ठाकरे बाबरी मशिदीच्या आसपास तर सोडाच पण अयोध्येतही पोहोचले नव्हते. पण आता बाबरी मशिदीच्या जागी भव्य राम मंदिर उभे राहिल्यानंतर आपल्याला “व्हीव्हीआयपी” निमंत्रण नाही म्हणून उद्धव ठाकरे गटाने थयथयाट केला. राम मंदिर कोणाची “प्रॉपर्टी” नाही, अशी भाषा संजय राऊत यांनी वापरली. त्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने महा थयथयाट चालवला आहे.
अयोध्यातल्या राम मंदिराच्या लोकार्पणाचे शरद पवारांना निमंत्रण नाही. आपण तसेही मंदिरात जातच नाही, असे सांगून पवारांनी काल तो विषय टाळण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे सोशल मीडियावर “द्राक्षे आंबटची” चर्चा सुरू झाली. ही चर्चा पाहूनच संतापलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी आज राम मंदिरा बाबत “बापाच्या जहागिरीची” उर्मट भाषा केली. शरद पवारांना राम मंदिर लोकर्पणाचे निमंत्रण नाही याचा आव्हाडांना इतका संताप आला की राम मंदिर कोणाच्या “बापाची मालमत्ता” नाही. राम कोणाच्या मालकीचा नाही. आम्ही वाटेल तेव्हा केव्हाही जाऊन रामाचे दर्शन घेऊ शकतो. चातुर्ण्याचे समर्थक मंदिराचे छोटे दरवाजे करून आम्हाला अडवू शकत नाहीत. आम्हाला मंदिरा बाहेर उभे करू शकत नाहीत. आम्ही ते दरवाजे तोडू आणि आत मध्ये प्रवेश करू, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहून राम मंदिर उभारणीच्या यशस्वीतेबद्दल आपल्या मनातली मळमळ ओकली आहे.
राम मंदिराच्या भूमिपूजन काळात आता कोरोना आहे. कोरोना काळात कशासाठी भूमिपूजनाचे सोहळे?? असा सवाल शरद पवारांनी केला होता.
त्याआधी बाबरी मशीद आंदोलनात मशिदीच्या राम जन्मभूमी आंदोलनाला देखील राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधच केला होता. बाबरी मशिदी विरुद्धच्या संघर्षात पवार आणि त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बिलकुलच सहभागी नव्हते. त्यावेळी त्यांची “धर्मनिरपेक्षता” बाबरी मशिदीची “ढाल” बनून “रक्षण” करत होती. पण पूर्ण हिंदू समाजाच्या इच्छाशक्तीने आणि कारसेवकांच्या हिमतीने बाबरी मशीद उध्वस्त झाली प्रचंड मोठ्या संघर्षानंतर अयोध्यातील राम जन्मभूमी स्थान राम मंदिर उभे राहिले. 22 जानेवारीला याच राम जन्मभूमी मंदिरात श्रीरामलल्लांची प्रतिष्ठापना होत आहे. अशा वेळी हे भव्य दिव्य यश पाहून पोटात कळ आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली पोटातली गरळ ओकली आहे.
जितेंद्र आव्हाडांना तसे नेहमीच संविधान संविधानाचे रक्षण असे मुद्दे सुचत असतात. महाराष्ट्रात पवार प्रणित महाविकास आघाडीचे सरकार असले की संविधानाचे “आपोआप” “रक्षण” होते आणि दुसऱ्या कुठल्याही पक्षाचे सरकार आले की संविधान “आपोआप” “धोक्यात” येते, हा आव्हाडांचा लाडका “सिद्धांत” आहे. तोच “सिद्धांत” त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पुन्हा मांडला आहे.
यातूनच त्यांनी एक दिवस तुम्हाला काय थोतांड करायचे ते करून घ्या. तुम्ही रामाचा बाजार मांडला हे अख्या देशाला माहिती आहे, पण देशात सर्व मंदिरांचे दरवाजे खुले करून सर्व मंदिरे उघडे करणारे बाबासाहेब हवे आहेत की छोटे दरवाजे करून व्हीआयपी दर्शन ठेवणारे चातुर्वण्याचे समर्थक हवे आहेत हे जनतेने ठरवले आहे. राम मंदिर कोणाच्या बापाची जहागिरी नाही. राम कोणाच्या मालकीचा नाही. साडेचार वर्ष काही करायचे नाही उरलेल्या सहा महिन्यांत फक्त रामराम करायचे पण देशातली जनताच आता तुम्हाला राम राम म्हणायला लागेल, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी थयथयाट केला आहे.