- लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत ही वेळ अमावस्या दिवशीची पुजा महत्त्वाची.
- या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेताततल्या लक्ष्मीची पुजा मांडली जाते. शेतात खरीप व रब्बी या दोन हंगामात मिळून वेळ अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पुजा केली जाते.
- मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात. In agricultural culture, this time is important for the worship of the new moon day.
विशेष प्रतिनिधी
लातूर : भारत हा कृषीप्रधान देश आहे .येथील सणवार देखील कृषीशी निगडीत असतात. असाच एक सण म्हणजे वेळ अमावस्या. वेळ अमावास्या (किंवा वेळा अमावास्या, मराठी ग्रामीण भाषेत येळवस) हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद,लातूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. यासाठी आज मराठवाडा सज्ज झाला आहे. या सणाला आपल्या शेतातल्या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील सर्व लहान थोर शेतात वनभोजनाचा आनंद लुटत असतात.
बैलपोळा आणि वेळअमावस्या हे सण शेतकऱ्यांच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे समजले जातात. बैलपोळयादिवशी ज्याच्या जिवावर शेती चालते, त्या बैलांची पुजा केली जाते, तसेच त्यांनी गोडधोडाचा नैवद्य देखील दाखवला जातो.तर वेळ अमावस्येदिवशी ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो त्या काळया आईची पुजा केली जाते.
वेळ अमावस्या म्हणजे काय ?
पेरणीनंतरची सातवी अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या. जूनमध्ये पेरणी होते. सातवी अमावस्या डिसेबंर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवाड्यात येते. खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते. तुरही ऐन बहरात असते. रब्बी हंगामातील पेरणी होऊन सपुंर्ण शेती हिरवीगार झालेली असते. ऊनाची तीव्रता देखील नसते. वेळ अमावस्या साजरी करण्याची प्रथा कधी सुरू झाली असावी, याबाबतची निश्चित नोंद उपलब्ध नाही. वेळ अमावस्येच्या काळात लातूरसारख्या शहरी भागात तर कर्फ्यूसारखे वातावरण रस्त्यावर दिसते. आपल्यापेक्षा कोणीतरी अज्ञात शक्ती मोठी आहे. त्यासमोर वर्षातून एकदा तरी नतमस्तक व्हावे, याची शिकवणूक देणारी संस्कृती जोपासायची परंपरा यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.
ऊसाचे गाळप सुरू होत असल्यामुळे, वेळ अमावस्येला ऊस खाण्याची हौस भागवता येते. तसेच ऊसाच्या रसाचा आनंदही उपभोगता येतो. घरोघरी गौरीपुजनाचे महत्त्व, जितके असते तितकेच महत्त्व शेतात यादिवशीच्या लक्ष्मीपुजनाला असते. रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या रानात उंडे व अंबीलचा काला तसेच पाण्याचा चर शिंपडला जातो. तोंडातून हर हर महादेव, हरभला असे म्हणत शेतकरी सर्व शेतात फिरतो. ज्वारी व बाजरीचे उंडे, सर्व भाज्यांपासून तयार केली जाणारी भाजी व अंबिल या पदार्थांना वेळ अमावस्येच्या दिवशी जेवणात पहिल्या दर्जाचा मान असतो.
नुकताच आलेला वाटाणा, तुरीचे दाणे घालून केलेली भाजी, तीळगुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लावून केलेली आंबील अशा पदार्थाचा आस्वाद घेण्यात येतो. आंबील, गव्हाची खीर, भज्जी, भाकरी, कुटलेली शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेसा, नंतर बोर, पेरू हरबरे, असे असंख्य पदार्थ असतात.