विशेष प्रतिनिधी
नाशिक : Kumbh Mela in Nashik : पुढील वर्षी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या या कुंभमेळ्याला भाविकांची प्रचंड गर्दी होते. या कुंभमेळ्याच्या तयारीला आता वेग आला आहे. केंद्र आणि राज्य शासन हातात हात घालून या कुंभमेळ्याची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर, नाशिकमधील अपेक्षित गर्दीचा विचार करता, रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
नाशिकमध्ये 31 ऑक्टोबर 2026 पासून सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या या धार्मिक उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होतात. या भाविकांच्या गर्दीला आवश्यक सेवा-सुविधा पुरवण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये रेल्वे आणि बसने येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने गर्दीची समस्या निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नाशिक रोड रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आभार मानले आहेत.
प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. या कुंभमेळ्यादरम्यान दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन काहींना जीव गमवावा लागला होता. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे. रेल्वे स्थानकावर एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरियाची व्यवस्था केली जाणार आहे.
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर 5000 प्रवासी सामावू शकतील अशा होल्डिंग एरियाची निर्मिती केली जाणार आहे. यात 21 चौरस मीटरचे तात्पुरते आणि कायमस्वरूपी असे दोन स्वतंत्र होल्डिंग एरिया तयार केले जाणार आहेत. या होल्डिंग एरियामध्ये प्रवाशांसाठी तिकीट काउंटर, पब्लिक अॅड्रेस सिस्टम, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षेसाठी आवश्यक साधने यासारख्या सुविधा उपलब्ध असतील. तसेच, हा संपूर्ण परिसर सुरक्षा यंत्रणेच्या देखरेखीखाली असेल. कुंभमेळा पावसाळ्याच्या काळात होत असल्याने या होल्डिंग एरियामध्ये त्यानुसार व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिकमधील कुंभमेळ्याला सुमारे तीन कोटी भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. 2015 मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत यावेळी 50 टक्के अधिक लोक येतील, असा अंदाज घेऊन प्रशासन तयारी करत आहे. रेल्वे स्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी भाविकांना प्रथम होल्डिंग एरियामध्ये थांबवले जाईल आणि केवळ आरक्षित तिकिट असणाऱ्या भाविकांनाच स्थानकात प्रवेश दिला जाईल.
Important decision of the Railway Administration in the backdrop of Simhastha Kumbh Mela in Nashik
महत्वाच्या बातम्या
- Sushila Karki : सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान; राष्ट्रपतींनी 6 महिन्यांत निवडणुका घेण्याची घोषणा केली
- ट्रम्प टेरिफच्या अतिरेकामुळे अमेरिकेत महागाईचा कहर; भारतात GST कमी केल्याने स्वस्ताईची लहर!!
- Haribhau Rathod : मराठा आरक्षणावरून हरिभाऊ राठोड संतापले- आम्ही ओबीसी येडे आहोत का? भुजबळ एका समाजापुरतेच मर्यादित
- Suresh Dhas advice to the Hake : आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात; आक्रस्ताळेपणा बंद करा ! सुरेश धस यांचा हाकेंना सल्ला