वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. दररोज 8 लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. Health Minister concerned over vaccination drive
राज्यातील 18 ते 44 वयोगटातील 5 कोटी 71 लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे 12 कोटी डोसची आवश्यकता आहे. 1 मे पासून लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे. पण, त्यासाठी लस उपलब्ध करणे आव्हानात्मक काम असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी टोपे यांनी सांगितले. राज्यात ऑक्सिजनच्या वापराबाबत प्रमाणीत कार्यपद्धती (एसओपी) निश्चित केली असून त्यानुसार रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर रुग्णालयांनी नंदूरबार पॅटर्ननुसार ऑक्सिजन नर्सची नेमणूक करावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
लसीकरण मोहीम दृष्टिक्षेपात
- 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी 12 कोटी डोस लागतील. सिरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांना पत्र पाठविले आहे.
- लस सरसकट मोफत द्यायची की आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना यचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल. त्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने पाठविला आहे.
- 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार लसीकरणाची वेळ दिली जाणार आहे. त्यामुळे १ मे पासून लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये,असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.