प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्रातील सर्व सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातील सफाई कामगारांच्या मागण्यांबाबत सदस्य भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते. Govt positive about employing heirs of scavengers; Chief Minister’s announcement
यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सफाई कामगारांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसारच नियुक्त्या दिल्या जात आहेत. ज्या ठिकाणी वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्त्या दिल्या जात नाहीत, अशा प्रकारांची माहिती लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सफाई कामगारांची पदे भरताना वाल्मिकी समाजावर अन्याय होणार नाही, याबाबत मंत्रिमंडळ बैठकीतही सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.
राज्यातील सफाई कामगारांच्या सुविधांसाठी राज्य शासनाने लाड-पागे समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या निवेदनातील मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. या उपसमितीच्या बैठकीत राज्यातील कामगारांच्या सुविधांसाठी अस्तित्वात असलेल्या विविध विभागांचे शासन निर्णयांचे एकत्रिकरण करून एकच शासन निर्णय (जीआर) काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सफाई कामगारांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. राज्यातील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत लाड – पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा प्रस्ताव लवकर मंत्रिमंडळ बैठकीत येणार आहे. याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मंत्री संजय राठोड यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
Govt positive about employing heirs of scavengers; Chief Minister’s announcement
महत्वाच्या बातम्या