• Download App
    अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना – नायकडा समाज कुंभ २०२३ ची तयारी अंतिम टप्प्यात; 8 राज्यातून येणार 10 लाख भाविक Gor banjara community kumbh to be organised in jalgaon district jamner taluka godri town

    अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना – नायकडा समाज कुंभ २०२३ ची तयारी अंतिम टप्प्यात; 8 राज्यातून येणार 10 लाख भाविक

    पूज्य धोंडीराम महाराज आणि आचार्य चंद्राबाबा यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार

    प्रतिनिधी

    जळगाव : येत्या २५ ते ३० जानेवारी दरम्यान जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाज कुंभ होत आहे. या कुंभाची सर्व व्यवस्थात्मक तयारी पूर्ण होत आली आहे. धर्म स्थळ, कुंभ स्थळ, निवास व्यवस्था, वाहन तळ, यातायात, भोजन व्यवस्था पूर्ण होत आल्या आहेत. या 6 दिवसीय कुंभात विविध राष्ट्रीय संत महात्मे भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि साधारण १० लाख भाविक या सहा दिवसीय कुंभ सोहळ्यात येतील, असा अंदाज आहे. तेलंगना, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून बंजारा, लबाना आणि नायकडा समाज येणार आहे. Gor banjara community kumbh to be organised in jalgaon district jamner taluka godri town

    या पार्श्वभूमीवर माध्यमांना माहिती देण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना समाज कुंभ संचालन समितीचे अध्यक्ष पूजनीय श्याम चैतन्य महाराज यांनी संबोधित केले. यावेळी कुंभ जनजागृती समिती चे अध्यक्ष भानुदास चव्हाण सुद्धा उपस्थित होते.

    पूज्य श्याम चैतन्य महाराज म्हणाले, बंजारा समाज हा हिंदू धर्म जाणणारा आणि मानणारा समाज आहे. परंतु बंजारा समाजाला धर्मातरण करण्यासाठी लक्ष केले गेले आहे. संतांच्या संपर्कातून माहित झाल्यानुसार ३५०० तांड्यामध्ये प्रत्यक्ष ख्रिश्चनीकरण सुरू झाले आहे किंवा ख्रिश्चनांशी संपर्क आल्याने त्यांनी हिंदू संस्कार सोडले आणि चर्च मध्ये जात आहेत. पण आपल्या दाखल्यावर ST किंवा NT लिहून घेतात असे सुद्धा छुपे ख्रिश्चन आहेत.

    काही जण गोर धर्म हा स्वतंत्र धर्म असून बंजारा हिंदू नाहीत, असा अपप्रचार करत आहेत. लातूर येथे बंजारा समाजाने हिंदू संस्कार सोडावे आणि गोर धर्मीय संस्कार अंगीकारावे म्हणून दबाव टाकण्यात आला आहे. बंजारा समाजाचे होणारे ख्रिस्तीकरण रोखण्यासाठी आणि समस्त बंजारा, लबानाव नायकडा समाज एकत्र येण्यासाठी २५ ते ३० जानेवारी दरम्यान हा कुंभ होत आहे व त्याचे आयोजन संतांनी आणि बंजारा समाजाने केले आहे.

    कुंभ आयोजन निश्चित झाल्यावर त्या त्या गावातील नाईक आणि कारभारी यांचे तांडाश: एकत्रिकरण ९५०० तांड्यावर झाले. यासाठी बंजारा समाजाचे २१८ कार्यकर्ते पुर्णपणे ३ महिन्यापासून सेवा देत आहे. तसेच बंजारा समाजाचे ४०० संत जागरणासाठी तांड्यावर फिरले आणि त्यात्या क्षेत्रात छोट्या मोठया ५५०० बैठका आणि संमेलने झाली. प. पू. बाबूसिंग जी महाराज, प.पू. गोपालजी चैतन्य महाराज, प.पू. सुरेशजी महाराज , श्री. श्यामजी चैतन्य महाराज, प.पू.महंत १००८ श्री रामसिंग महाराज, प. पू.१००८ श्री श्री चंद्रसिंगजी महाराज हे संत अनेक गावी जाऊन त्यांनी भेटी दिल्या आहेत व समाजाशी प्रत्यक्ष संपर्क साधला आहे.

    500 एकर क्षेत्रात गोद्री कुंभाची जय्यत तयारी सुरू; 10 लाख भाविक येण्याचा अंदाज

    7 नगरांची निर्मिती, 50 हजार भाविकांची निवास व्यवस्था होणार

    जामनेर तालुक्यातील गोद्री येथे 500 एकर क्षेत्रात अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाज कुंभाच्या तयारीला वेग आला असून भाविकांच्या निवास व्यवस्थेसाठी 7 नगरांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये 50 हजार भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच दिवसभरात कुंभमेळ्यात येणार्‍या 1.50 लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी भोजन तयार करण्यासाठी 7 मोठी स्वयंपाक घरे उभारण्यात आली आहेत.

    भोजन वितरण व्यवस्था

    गोद्री येथील कुंभमेळ्यात दाखल होणार्‍या भाविकांसाठी दिवसभर अन्नक्षेत्रात भोजनाची व्यवस्था असणार आहे. कुंभस्थळी मुख्य सभामंडपाच्या समोरील बाजूस ही भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. त्यात दररोज दीड लाखापेक्षा अधिक भाविक दिवसभरात भोजन करतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

    4 हेलीपॅडची उभारणी

    6 दिवसीय कुंभासाठी देशभरातून विविध राष्ट्रीय संत, राजकीय नेते, मंत्री तसेच विशेष अतिथी येणार आहे. येणार्‍या प्रमुख पाहुण्यांच्या सोयीसाठी चार हेलीपॅडची उभारणी करण्यात येत आहे.

    महिलांसाठी स्वतंत्र नगराची निर्मिती
    कुम्भासाठी दहा लाख भाविक तेलंगाना, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातून येणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी सात नगरांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी एक स्वतंत्र नगर महिलांसाठी असणार आहे. तसेच अडीच ते तीन हजार महिलांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या नगरात मंडपात निवास व्यवस्थेसह अंघोळीसाठी स्नानगृहे साकरण्यात येत आहेत. त्यात पिण्याच्या पाण्यासह अत्याधुनिक पध्दतीच्या शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे.

    250 एकर मंडपासह 6 डोम नव्वद संत कुटीया

    250 एकरच्या मंडपातील गोद्री कुंभात 6 डोम व नव्वद संत कुटीया उभारण्याचे काम सुरू आहे. त्यात मुख्य सभागृहाचा डोम जर्मन हँगर उज्जैन येथून येणार आहे. कुंभात सभा मंडपाचा डोम हा मुख्य डोम असणार आहे. याठिकाणी विशेष मान्यवर येणार असल्याने त्यादृष्टीने त्यांची उभारणी करण्यात येणार आहे.

    धार्मिकस्थळी गुरूव्दाराच्या लंगर कडून होणार अन्नदान

    बचत गटाच्या स्टॉलची उभारणी गोंद्री येथील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी बचत गटाच्या स्टॉलला जागा देण्यात आली आहे. त्यात २०० बचतगट आपल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन लावणार आहे. धार्मिक स्थळी मंदिराच्या मागच्या बाजूला केंद्रीय कार्यालय असणार आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अमृतसर, नांदेड येथील गुरूव्दाराच्या माध्यमातून भाविकांसाठी प्रसादाचे लंगर लावण्यात येणार आहेत.

    2 हजार पोलीसांचा बंदोबस्त

    कुंभात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता याठिकाणी दोन हजार पोलिसांचा बंदोबंस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय अग्निशामक दल, रुग्णवाहिका, रुग्णालय अश्या व्यवस्थाही करण्यात आल्या आहेत. तसेच मोबाईल कॉनेक्टीविटी साठी बीएसएनएल कडून तात्पुरत्या स्वरूपाचे मोबाइल टॉवरची उभारणी करण्यात येणार आहे.

    • गोद्री कुंभात लबाना समाजाच्या पूज्य धोंडीराम बाबा आणि आचार्य चंद्रबाबा यांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा होणार
    • ज्या गोद्री ग्राम मध्ये कुंभ होत आहे ते पूज्य धोंडीराम बाबाजी आणि आचार्य चंद्र बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे व त्यांचा थेट गुरुनानक देव जी यांच्याशी संबंधित मोठा इतिहास आहे. त्यामुळे कुंभादरम्यान लबाना समाजातील श्रद्धास्थान असलेल्या पूज्य धोंडीराम बाबा आणि आचार्य चंद्र बाबा यांच्या मंदिराची गोद्री येथे उभारणी झालेली असून मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
    • गोद्री येथे पूज्य धोंडीराम बाबाजी यांचा मोठा इतिहास आहे. पूज्य धोंडीराम बाबा यांनी समाजात अध्यात्मिक व सामाजिक जागृती केली. यांचा जन्म १८०३ मध्ये नानक जवळा, ता. पुसद जि. वाशीम येथे झाला. १८७२ साली ते गोद्री येथे स्थायिक झाले होते. बाबाजींकडे १० हजार गाई व एक हजार एकर शेती होती. त्यांचेकडे गोधना सोबत पाचशे ते सहाशे म्हशीही होत्या. त्यांचा मुख्य व्यवसाय गोपालन व मिठाचा व्यापार होता. हा समाज गोसेवक समाज असून असून गाय भाकड झाली तरी तिला कसाईला विकत नाही. गाय मेली तर तीला जमिनीत पुरले जाते.
    • धोंडीरामबाबा हे आयुर्वेदिक औषधीचे जाणकार होते. त्यांच्याकडे पंचक्रोशीतील अनेक रुग्ण औषधीसाठी येत असत. दुधाचे स्टॉल लावून वाटसरुंना मोफत गायीचे दूध देत असत. आज धोंडीरामबाबा यांची चौथी पिढी गोद्रीला आहे. नानकजवळा ता. पुसद जिल्हा वाशीम येथे बाबाजिंचा मळा आहे. गोद्रीमध्ये धोंडीरामबाबा यांच्या चौथ्या पिढीतील ५० घरांचा गोतावळा ( नातेवाईकांची ५० घरे ) आहे.
    • याच ठिकाणी दुसरी मूर्ती प्राण प्रतिष्ठा प.पू.आचार्य श्री चंद्रबाबा यांची होणार आहे. ज्यांची स्थानिक लबाना समाजात मोठी श्रद्धा आहे. आचार्य चंद्रबाबा हे गुरुनानकदेव आणि सुलक्खणी देवीचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म १४९४ मध्ये पंजाबच्या सुल्तानपूर लोधी येथे झाला. वयाच्या ११ व्या वर्षी धार्मिक ग्रंथ अध्ययनसाठी श्रीनगर येथील आचार्य पुरुषोत्तम कौल यांच्या गुरुकुलात ते गेले होते. यानंतर अविनाशी मुनी यांच्याकडून दीक्षा मिळाली. त्यांनी एकांत साधनाही केली तसेच त्यांनी ऐतिहासिक उदासी ( उदासीना ) सांप्रदायाची स्थापना केली.
    • आचार्य चंद्रदेव बाबा यांनी सिंध ,बलुचिस्तान, काबूल ,कंधार आणि पेशावर दरम्यान प्रवास करून विविध सांप्रदायाच्या, पंथांच्या पवित्र व्यक्तींशी संवाद साधला. त्यांनी हरिद्वार ,कैलास मानसरोवर, नेपाळ आणि भूतान,आसाम ,पुरी ,सोमनाथ, कन्याकुमारी आणि सिंहली दौरा केला. जाती आणि पंथात भेदभाव केला नाही. ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी सांप्रदायातील मतभेद कमी करण्यासाठी आदि शंकराचार्य यांच्या उपदेशानुसार गणेश ,सूर्य, विष्णू, शिव आणि शक्तीला लोकप्रिय बनविले आणि सत्य, संतोष, क्षमा, आत्म अनुशासन आणि मानवजातीची एकता हा उपदेश केला.
    • प.पू. श्री चंद्रबाबा यांनी कर्तारपुर (पाकिस्तान) येथे गुरुनानक देव यांचे स्मारक बनविले त्याला डेराबाबा नानक (पाकिस्तान) नावाने ओळखले जाते.त्यांचा उदासी आश्रम ,जालंधर जो वर्तमानकाळात स्वामी शांतानंदद्वारे संचलित आहे . येथे श्री चंद्रबाबा यांच्या सर्व उपदेशांचे प्रचार प्रसार चे कार्य होत असते.
    • बाब मख्खन शहा लबाना हे लबाना समाजाचे मुख्य पूर्वज समजले जातात. ते रेशीम आणि मसाल्याचा व्यापार करणारे होते. व्यापार दरम्यान शीख बांधव त्यांच्यासोबत काम करत होते . दरम्यान समुद्री वादळात जहाजे अडकली असता जो वादळातून जहाजे सुखरूप बाहेर काढेल त्याला ५०० मोहर देण्याची अरदास त्यांनी केली. तसे घडले आणि ते गुरु तेगबहादूर होते. त्यामुळे लबाना समाज आणि गुरुनानक देव अशी ऐतिहासीक पार्श्वभूमी या कुंभाला आहे.

    या कुंभात प्रमुख आकर्षण

    धार्मिक विधी – पल्ला, मूर्ती स्थापना, कृष्णलीला, अरदास व भोग लावणे
    सांस्कृतिक – भजन ,नगारा खेळ पारंपरिक पेहराव पुरुष व महिला,पट खेळणे,साहसी खेळ व तलवार उचलणे .
    प्रदर्शनी व स्टॉल -इतिहास (महापुरुष, संत आणि वास्तू), वेशभूषा (पारंपारिक पेहराव),
    भाषा – पुस्तके, गीत, कथा, धार्मिक स्थळे, संस्कृती दर्शवणारी भव्य प्रदर्शनी

    कार्यक्रम रूपरेषा

    २५ जानेवारी बुधवार
    स .९ ते १० वा. पल्ला ,१०.३० ते ११.३० वा. मूर्ती स्थापना, दु .१२ ते ४ वा. सांस्कृतिक/ व्यासपीठ कार्यक्रम, सायंकाळी ४ ते ६ वा. संत प्रवचन /संत सेवालाल अमृतलीला,संध्या.७ ते १० वा . देवी भागवत

    २६ जानेवारी

    स.११ ते ४ वा पर्यंत सांस्कृतिक/व्यासपीठ कार्यक्रम,सायंकाळी ५ ते ७.३० वा.संत प्रवचन /संतसेवालाल अमृतलीला , रात्री ७.३० ते १० देवी भागवत/ कृष्णलीला/रामनाव संत रामरावबापू अमृतवाणी

    २७ जानेवारी – स.११ ते ४ वा पर्यंत सांस्कृतिक/व्यासपीठ कार्यक्रम,सायंकाळी ५ ते ७.३० वा.संत प्रवचन /संतसेवालाल अमृतलीला , रात्री ७.३० ते १० देविभागवत/ कृष्णलीला/रामनाव संत रामरावबापू अमृतवाणी

    २८ जानेवारी– स.९ ते १०.३० पल्ला,स .११.३० ते ४ वा .सांस्कृतिक/व्यासपीठ कार्यक्रम, साय.४ ते ७ संत प्रवचन /संत सेवालाल अमृतलीला, रा.७ ते १० देवी भागवत/ कृष्णलीला/रामनाव संत रामरावबापू अमृतवाणी

    २९ जानेवारी – स.१०.३० ते ४ वा.
    सांस्कृतिक/ व्यासपीठ कार्यक्रम, साय.४ ते ७ संत प्रवचन /संत सेवालाल अमृतलीला, रा.७ ते १० देविभागवत/कृष्णलीला /रामनाव/संत रामरावबापू अमृतवाणी

    ३० जानेवारी- स. १०.३० ते ४ वा. सांस्कृतिक/ व्यासपीठ कार्यक्रम, सायं.४ ते ७ संत प्रवचन /संत सेवालाल अमृतलीला, रा.७ ते १० देवी भागवत/कृष्णलीला /रामनाव/संत रामरावबापू अमृतवाणी
    रात्री १० – समारोप

    दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय कार्यालय, कुंभ स्थळ येथे ध्वजारोहण होणार आहे.

    Gor banjara community kumbh to be organised in jalgaon district jamner taluka godri town

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!