विशेष प्रतिनिधी
मुंबई : Girish Mahajan प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख न केल्याचा आरोप होताच नाशिकमध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात एका महिला वनकर्मचाऱ्याने थेट घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेचे पडसाद राजकीय आणि सामाजिक स्तरावरही उमटू लागले आहेत. बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा मुद्दा पुढे येताच आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या, तर विरोधी पक्षांनीही महाजनांवर जोरदार टीका सुरू केली. दुसरीकडे, गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी आंदोलन आणि निषेधाची धार अद्याप कायम आहे.Girish Mahajan
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजवंदन सोहळा गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर त्यांनी केलेल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख नसल्याचा आरोप करण्यात आला. याच मुद्द्यावर माधवी जाधव या महिला वनकर्मचाऱ्याने कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. बाबासाहेबांचा नामोल्लेख कसा काय टाळला? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. वर्दीत असतानाच मंत्र्यांना जाहीर प्रश्न विचारल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. निलंबन झाले तरी चालेल, पण बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका माधवी जाधव यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे हा प्रकार केवळ एका भाषणापुरता मर्यादित न राहता मोठ्या वादात बदलला.
आंबेडकरी संघटना आणि भीम सैनिक रस्त्यावर
या घटनेची माहिती पसरताच नाशिकमधील आंबेडकरी संघटना आणि भीम सैनिक रस्त्यावर उतरले. गिरीश महाजन यांनी जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही या मुद्द्यावर महाजनांवर टीकास्त्र सोडले. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी, संविधानाला मानणाऱ्यांचे हे वर्तन नाही, असा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चेतन गांगुर्डे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देत, महाजनांची मानसिकता बाबासाहेबांच्या विचारांशी विसंगत असल्याचा आरोप केला. दरम्यान, माधवी जाधव यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही दिला, त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला.
40 वर्षांपासून आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रमांमध्ये सहभागी – महाजन
वाद अधिक चिघळत असतानाच गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या घोषणाबाजीची मोठी चर्चा सुरू असताना, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर महाजन म्हणाले की, भाषणात चुकून बाबासाहेबांचा उल्लेख राहून गेला असेल तर त्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त करतात. त्यानंतर रात्री त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच आपण आहोत, असे म्हणत त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांप्रती आपली निष्ठा दर्शवली. भाजपचे संस्कार बाबासाहेबांचे विचार जपणारे असल्याचे सांगत, आपण स्वतः गेल्या 40 वर्षांपासून आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या पोस्टसोबत त्यांनी आपल्या भाषणाची क्लिपही शेअर केली आहे.
दिलगिरीनंतरही वाद पूर्णपणे शांत झालेला नाही
मात्र, गिरीश महाजनांच्या दिलगिरीनंतरही वाद पूर्णपणे शांत झालेला नाही. शासकीय कर्मचारी, तीही महिला, अशा प्रकारे थेट मंत्र्यांना जाहीरपणे सवाल करताना सहसा दिसत नाही, मात्र बाबासाहेबांच्या नामोल्लेखाचा मुद्दा असल्याने माधवी जाधव यांनी घेतलेली भूमिका अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या धाडसाची चर्चा वनविभागासह इतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही सुरू आहे. दुसरीकडे, आंदोलनाची भूमिका घेतलेल्या आंबेडकरी संघटनांनी हा विषय केवळ एका चुकापुरता मर्यादित न ठेवता, बाबासाहेबांच्या सन्मानाशी जोडलेला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिलगिरीनंतरही हा वाद राजकीय आणि सामाजिक पातळीवर आणखी किती काळ तापणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
BJP Values Respect Dr. Ambedkar: Girish Mahajan Clarifies Nashik Speech Row
महत्वाच्या बातम्या
- CM MK Stalin : स्टालिन म्हणाले- तमिळनाडूमध्ये हिंदीसाठी जागा नाही; भाषा लादण्याचा नेहमीच विरोध करू
- 77 व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची प्रगती आणि आर्थिक आत्मनिर्भरतेचा जयघोष; उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर!!
- उपासना धर्मापुरता मर्यादित राहिलेल्या समाजाला राष्ट्रधर्माची गरज; भैय्याजी जोशींचे प्रतिपादन
- संविधानाचा जागर ते दुष्काळ आता भूतकाळ; प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत चित्ररथांची झलक!!, पाहा फोटो फीचर