विशेष प्रतिनिधी
आमदार मुक्ता टिळक, आमदार लक्ष्मण जगताप, खासदार गिरीश बापट यांच्या एकापाठोपाठ एक झालेल्या निधनामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातल्या भारतीय जनता पार्टीची जी हानी झाली आहे, ती खरंच कधीही न भरून येणारी आहे. हे वाक्य नियमित श्रद्धांजलीचे नाही. कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून येणे कठीण आहे, अशा आशयाची श्रद्धांजली वाहण्याची प्रथा आहे. त्या प्रथेनुसारचे हे विधान नाही, तर खरंच मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप आणि गिरीश बापट यांच्या निधनामुळे भारतीय जनता पार्टीची जी हानी झाली आहे, ती भरून काढणे खूप म्हणजे खूप कठीण आहे. ही हानी संघटनात्मक आणि राजकीय पातळीवरची आहे. Girish Bapat, mukta tilak and laxman jagtap deaths created most challenging situation for BJP in pune and pcmc
काँग्रेसी संस्कृतीचे वर्चस्व
पुणे आणि पिंपरी चिंचवडचा राजकीय इतिहास पाहिला, तर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संघटनात्मक आणि सत्तेच्या वर्चस्वाचा राहिला आहे. या दोन्ही शहरांमध्ये आधीचा जनसंघ आणि नंतरचा भाजप यांचे अस्तित्व नव्हते, असे अजिबात नाही. ते अस्तित्व होतेच. किंबहुना ठळक अस्तित्व होते. पण पुण्याच्या राजकीय संस्कृतीवर काँग्रेसीच छाप होती, ही वस्तुस्थिती आहे.
आधी काँग्रेसच्या आणि नंतर राष्ट्रवादी यांच्या सर्वंकष वर्चस्वाला आधीच्या जनसंघाला आणि नंतरच्या भाजपला फार मोठा धक्का कधीही देता आला नव्हता. तो धक्का 2014 नंतर गिरीश बापट यांच्या नेतृत्वाने दिला आणि याच कालावधीत मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्यासारखी संघटनात्मक मजबुती मिळवत चाललेली माणसे भाजपमध्ये उभी राहात होती. भाजपच्या संघटनात्मक जाळ्याचा विस्तार पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये करण्यामध्ये या तीनही नेत्यांचा सिंहाचा वाटा होता.
1973 पासूनचा प्रवास
त्यातही गिरीश बापट हे तर 1973 पासून सक्रिय राजकारणात होते. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते ते नेते हा त्यांचा प्रवास होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते 5 वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या आधी अजितदादांनी सुरेश कलमाडींचे वर्चस्व मोडून पुणे महापालिकेवर स्वतःचे वर्चस्व निर्माण केले होते. पण अजितदादांच्याही वर्चस्वाला सुरुंग लावण्याची क्षमता भाजपच्या लाटेत गिरीश बापट यांनी दाखवली होती. त्यांचे सर्व पक्षांशी उत्तम संबंध होते, हे खरेच. पण म्हणून पुण्याच्या राजकीय संस्कृतीवर काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढायला देखील त्यांनी कमी केले नव्हते हे देखील खरे!! देशातल्या मोदी लाटेचा आणि भाजपच्या कणखर धोरणाचा तो परिणाम होता.
कार्यकर्ता ते नेता
कुठलीही संघटना मजबुतीने उभी राहण्यासाठी शेकडो – हजारो कार्यकर्त्यांना खपावे लागते. त्यातून एखादा कार्यकर्ता नेत्याच्या रूपात तयार होतो. गिरीश बापट, मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे या स्वरूपाचे नेते होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या आठही विधानसभांमध्ये विजय मिळवला होता. हा ऐतिहासिक विजय होता. लोकसभेच्या निवडणुकीत त्यावेळी अनिल शिरोळे तब्बल 3 लाख 30 हजार मतांनी विजयी झाले होते. विजयाचे हे मार्जिन अभूतपूर्व होते. हे जसे भाजपच्या लाटेचे यश होते तसेच भाजपने संघटनात्मक पातळीवर काम केलेल्या कामाचीही पावती होती. या कामात गिरीश बापटांचा फार मोठा वाटा होता.
अण्णा जोशींनंतरचे पुण्याचे नेतृत्व
अण्णा जोशी यांच्यानंतर गिरीश बापट हे पुण्याच्या भाजपचे नेते म्हणून चेहरा समोर आला आणि तो बरीच वर्षे यशस्वीरित्या टिकला होता. पूर्वी दोनदा आमदारकी मिळाली की काँग्रेसमध्ये मंत्री होता येत असे. आणि कोणत्याही नेत्याची कारकीर्द 10 – 15 वर्षांची आमदारकी आणि मंत्रीपद यांनी संपुष्टात येत असे. गिरीश बापटांची कारकीर्द ते ज्या जनसंघ – भाजपमध्ये होते, त्या पक्षाच्या संपूर्ण प्रतिकूल काळापासून सुरू झाली, ती थेट संपूर्ण अनुकूल काळामध्ये समाप्त झाली. पण हा अवघड प्रवास गिरीश बापटांनी स्वकष्टाच्या बळावर आणि कौशल्याने केला.
काँग्रेसी संस्कृतीची छाप पुसताना
आज जेव्हा पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात भाजप संघटनात्मक पातळीवर मजबुतीने उभा राहत आहे, पुण्याची पुण्याच्या राजकीय संस्कृतीवरची काँग्रेसची छाप दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे घटक असणारे तीन नेते मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप आणि गिरीश बापट यांचे एका पाठोपाठ एक यांचे निधन होणे हा या अर्थाने भारतीय जनता पार्टीसाठी प्रचंड मोठा धक्का आहे!!
उत्तम क्षमतेची अकाली एक्झिट
भाजपला आता खऱ्या अर्थाने पुण्यात शहर पातळीवरचे आणि पिंपरी चिंचवड मध्ये शहर पातळीवरचे एक मजबूत नेतृत्व नव्याने उभे करावे लागणार आहे आणि हे काम सोपे नाही. गिरीश बापटांचे वय 73 होते. पण मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे वय जाण्याचे नव्हते. उलट ते दोघेही भाजपचे उभरते नेते होते. संघटनात्मक पातळीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरावर एक विशिष्ट प्रभाव निर्माण करण्याची त्यांच्यात क्षमता होती.
भाजप संस्कृतीची छाप तयार होताना…
पुणे – पिंपरी चिंचवड वर भाजपच्या राजकीय संस्कृतीची छाप तयार होत असताना आज त्यांच्यासारखे नेते विशिष्ट काळाच्या अंतराने निधन पावणे हा भाजपला संघटनात्मक पातळीवरचा फार मोठा धक्का आहे आणि म्हणूनच संपूर्णपणे नव्याने पक्ष बांधणी आणि नंतर नेतृत्व उभारणे हे पुणे – पिंपरी चिंचवडच्या भाजपसाठी फार मोठे आव्हान उभे करणारा आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनाने आणि गिरीश बापट यांच्या त्या पाठोपाठच्या निधनाने हे प्रचंड मोठे आव्हान उभे केले आहे.
Girish Bapat, mukta tilak and laxman jagtap deaths created most challenging situation for BJP in pune and pcmc
महत्वाच्या बातम्या
- डोकलाम मुद्द्यावरून भूतानने भारताला दिला धक्का, सीमावाद सोडवण्यात चीनला समान भागीदार म्हटले
- पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट, अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना गंडा
- पालघरमधील साधू हत्याकांडावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणी
- Hinduism : जगातील ६६ हून अधिक देश हिंदू धर्माला धर्म मानत नाहीत – परराष्ट्र राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांनी नोंदवला आक्षेप