– पोस्टरवरच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्राणावर बेतले, पण बोटांवर निभावले!!
नाशिक : आधुनिक अभिमन्यू ते आधुनिक शाहिस्तेखान असा महाराष्ट्राच्या राजकारणाचा गूढ प्रवास काल रंगला. महाविकास आघाडीतल्या बड्या बड्या भीष्माचार्य कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांनी रचलेले चक्रव्यूह आधुनिक अभिमन्यूने तोडले. तो त्या चक्रव्यूहातून दिमाखात बाहेर पडला. पण बाहेर पडता पडता त्याने महाविकास आघाडीतल्या पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांचा आधुनिक शाहिस्तेखान केला. Abhimanyu to modern Shahistekhan
महाविकास आघाडीने तुमच्या भोवती चक्रव्यूह रचला आहे. मनोज जरांगे यांच्यापासून ते सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत प्रत्येक जण फक्त तुम्हालाच टार्गेट करत आहे. यावर तुम्ही काय करणार??, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावेळी त्यांनी आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आम्ही चक्रव्यूह भेदून बाहेर येऊन बाहेर येऊ, असे उत्तर दिले होते. ते उत्तर फडणवीसांनी विधानसभा निवडणूक जिंकून खरे करून दाखविले. वस्तादाने टाकलेले डाव मोडून काढले. पण हे डाव मोडून टाकताना त्याने महाविकास आघाडीतल्या अनेकांचे आधुनिक शाहिस्तेखान केले. Abhimanyu to modern Shahistekhan
या आधुनिक अभिमन्यूने महाविकास आघाडीच्या बड्या बड्या नेत्यांची जिंकून येताना एवढी दमछाक केली की, त्यांच्या राजकीय प्राणावर बेतले होते, पण ते अखेर बोटांवर निभावले, असे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली. यातले अनेक नेते तर “भावी मुख्यमंत्री” म्हणून महाराष्ट्रातल्या रस्त्या रस्त्यांवर पोस्टरवर झळकत होते. पण विधानसभा निवडणूक मतमोजणीत त्यांना घाम फुटला. त्यांच्या राजकीय प्राणावर बेतले होते, पण बोटांवर निभावले!!
शरद पवार ज्यांच्याकडे महाराष्ट्राचे नेतृत्व देऊ इच्छित होते, ते बाळासाहेब थोरात संगमनेर मधून पडले. कराड उत्तर मधून पृथ्वीराज चव्हाण हरले. अमरावतीतून यशोमती ठाकूर पराभूत झाल्या. त्यातल्या त्यात जयंत पाटील 12000 मतांनी निवडून येऊन “सुरक्षित”पणे विधानसभेत पोहोचले.
पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार कसेबसे विजयी होऊन विधानसभेला येऊन मिळाले. नानांचा साकोलीतला विजय फक्त 208 मतांनी “साकार” झाला, तर रोहित पवार कर्जत जामखेड मधून अवघ्या 1243 मतांनी जिंकले. नाना पटोले आणि रोहित पवारांच्या राजकीय प्राणावरच बेतले होते, ते बोटांवर निभावले. चक्रव्यूह भेदणाऱ्या आधुनिक अभिमन्यूने नाना आणि रोहित पवारांचा राजकीयदृष्ट्या शाहिस्तेखान केला.
हे तेच नाना पटोले होते, ज्यांनी साकोली मतदारसंघातल्या जनतेला उद्देशून तुम्ही भावी मुख्यमंत्र्यांना मतदान करत आहात, असा प्रचार केला होता. त्याचबरोबर नानांच्या समर्थकांनी लाडूंवर भावी मुख्यमंत्री नाव लिहून त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. ते नाना पटोले फक्त 208 मतांनी जिंकले.
रोहित पवारांच्या बाबतीत देखील फारसे वेगळे घडले नाही. रोहित पवारांची भावी मुख्यमंत्री म्हणून समर्थकांनी रस्त्या रस्त्यांवर पोस्टर झळकवली होती. याच रोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे 85 आमदार निवडून आणून शरद पवारांना 85 व्या वाढदिवसाची भेट द्यायची होती. पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला मूळातच महाविकास आघाडीत लढायला 87 जागा आल्या. त्यातून 85 जागा निवडून आणण्याचे तर दूरच राहिले. पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या 10 वर आली.
अशा रीतीने आधुनिक अभिमन्यू ते आधुनिक शाहिस्तेखान असा महाराष्ट्राचा गूढ राजकीय प्रवास कालपासून सुरू झाला.