विशेष प्रतिनिधी
पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उदगीर (जि. लातूर) येथील ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. मात्र, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरील शरद पवारांची उपस्थिती ही काही बातमी ठरणार नाही. कारण गेल्या दहापैकी सात संमेलनांमध्ये पवार हे एकतर उदघाटक तरी होते, किंवा समारोपाच्या अध्यक्षस्थानी तरी होतेच. थोडक्यात, साहित्य संमेलनाला शरद पवार हवेतच, असा प्रघात पडलेला दिसतो आहे. For Marathi Sahitya Sammelans, Maratha Strongman Sharad Pawar is indispensable
गेल्या दहा वर्षांतील साहित्य संमेलने, संमेलनाध्यक्ष आणि पवार यांचे समीकरण पाहू या…
- २०१३ (८६वे) चिपळूण (श्री नागनाथ कोतापल्ले) : पवार उदघाटक
- २०१४ (८७ वे) सासवड (फ.मु. शिंदे) : पवार उदघाटक
- २०१५ (८८ वे) घुमान (डाॅ. सदानंद मोरे) : पवार उदघाटक
- २०१६ (८९ वे) पिंपरी (डाॅ. श्रीपाल सबनीस) : पवार उदघाटक
- २०१७ (९०वे) डोंबिवली (डाॅ. अक्षयकुमार काळे) : पवार उदघाटक
- २०१८ (९१वे) बडोदा (डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख) : पवार नव्हते
- २०१९ (९२वे) यवतमाळ (डाॅ. अरूणा ढेरे) : पवार नव्हते
- २०२० (९३वे) उस्मानाबाद (डाॅ. फ्रान्सिस दिब्रिटो) : पवार नव्हते
- २०२१ (९४वे) नाशिक (डाॅ. जयंत नारळीकर) : पवार समारोपाला
- २०२२ (९५वे) उदगीर (डाॅ. भारत सासणे) : पवार उदघाटक
(याशिवाय पवार हे २००४ चे औरंगाबाद, २००५च्या नाशिक संमेलनाचेदेखील उदघाटक होतेच.)
गंमत म्हणजे, याच पवारांना पुणे साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरून २०१०मध्ये पायउतार व्हावे लागले होते. ही घटना १९९०ची आणि पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. संमेलनात राजकारणी नकोत, ही भूमिका घेत पवार स्वागताध्यक्षपदी असण्याला अनेक साहित्यीकांनी आक्षेप घेतला. वाढत्या विरोधामुळे संमेलनाच्या उपस्थितीवर परिणाम होण्याची चिन्हे निर्माण झाली. अखेरीस पवारांनी स्वागताध्यक्षपद सोडल्यानंतरच या वादावर पडदा पडला होता.
पवारांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठांवर सातत्याने संधी मिळण्याचे महत्वाचे कारण म्हणजे संबंधित सातही संमेलनाच्या आयोजक संस्थांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा वरचष्मा असणे. ‘सुसंस्कृत नेता’ ही प्रतिमा जपण्यासाठी साहित्यीक, सांस्कृतिक कार्यक्रमांना पवारही आवर्जून जातात. राजकीयदृष्ट्या समतोल साधण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही बोलावले जात असल्याचे दिसते.