विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असताना मुंबईतील विधान भवनाच्या प्रवेशद्वारालगत आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग नेमकी कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण ती शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. Vidhan Bhavan
मुंबईतील विधानभवन परिसर नेहमीच गजबजलेला असतो. येथे सदैव नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी असते. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही येथे आपल्या समस्या घेऊन येत असतात. त्यामुळे सोमवारी दुपारी अचानक विधान भवनाच्या प्रवेशद्वारालागत आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यासंबंधीच्या माहितीनुसार, विधान भवनाच्या प्रवेशद्वारालगतच्या परिसरात ही आग लागली आहे. तेथून धुराचे काळे लोट बाहेर येत आहेत. अधिकाऱ्यांनी तत्काळ ही माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ही आग नेमकी कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण प्रवेशद्वारालगत असणाऱ्या स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ती लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. Vidhan Bhavan
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
आगीची घटना घडली तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान भवनातील एका कार्यक्रमात होते. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतील. स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला. विधान भवनाच्या रिसेप्शन एरियात जी स्कॅनिंग मशीन असते, त्यात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे छोट्या प्रमाणात ही आग लागली आहे. ती नियंत्रणात आलेली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या थोड्याच वेळात येथे येत आहेत. परंतु स्थिती नियंत्रणात असल्यामुळे कुणीही चिंता करण्याची गरज नाही. तूर्त, स्कॅनिंग मशीनमधील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वजण सुरक्षित आहेत, असे नार्वेकर म्हणाले. Vidhan Bhavan
सुरक्षेत चूक नाही, हा केवळ अपघात -नार्वेकर
पत्रकारांनी यावेळी त्यांना सुरक्षेतील चुकीसंबंधीचा प्रश्न केला. पण राहुल नार्वेकरांनी तो धुडकावून लावला. हा एक अपघात आहे. ही आग इस्टाब्लिशमेंटच्या कनेक्शनमध्ये लागली नाही. स्कॅनिंग मशीनमध्ये काही बिघाड झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले असेल. स्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. सर्वजण सुरक्षित आहेत. कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. मशिनच्या नुकसानीसंदर्भात आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे नार्वेकर म्हणाले.
आदित्य ठाकरेही अंबादास दानवेंसोबत घटनास्थळी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. ते घटनास्थळी आले तेव्हा राहुल नार्वेकर पत्रकारांशी संवाद साधून परत जात होते. जाता-जाता त्यांनी आदित्य ठाकरे यांना फारशी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. त्यानंतर ठाकरे व दानवे यांनी आग विझवणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून स्थितीचा आढावा घेतला.