विशेष प्रतिनिधी
रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्ताने स्वराज्याची राजधानी रायगडावर झालेल्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी केलेल्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजूर केल्या. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचा खरं म्हणजे टकमक टोकावरून कडेलोट केला पाहिजे, पण आपण लोकशाहीमध्ये राहात आहोत. त्यामुळे नियम तयार करून आपल्याला काम केले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार. त्यासाठी सुप्रीम कोर्टापासून हायकोर्टापर्यंत लढा देणार असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
उदयनराजेंच्या मागण्या
तत्पूर्वी, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठ्या मागण्या केल्या.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले :
आज एका थोर व्यक्ती समोर नतमस्तक होण्यासाठी उपस्थित राहिलो आहोत. समतेचा विचार त्यांनी दिला होता. एक युगपुरुष होऊन गेला ज्याने आयुष्य लोकांसाठी वेचले. स्वराज्याची स्थापना केली, लोकशाहीचा विचार त्यांनी दिला होता. लोकसहभाग राज्य कारभारात असला पाहिजे, त्याचा मूळ पाया त्यांनी रचला होता. अलिकडच्या काळात यात वाढ होताना दिसते. स्वत:चं आयुष्य वेचलं, आता त्यांचा अवमान केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक कायदा करण्यात यावा, जो नॉन बेलेबल असावा. छत्रपतींचा अवमान करणाऱ्याला 10 वर्ष बेल मिळता कामा नये.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा. जेणेकडून कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात एक सेन्सर बोर्ड स्थापन करावे. जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे एक सेंसर बोर्डची स्थापना करण्यात यावी.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्लीत स्मारक व्हावं
मी याआधी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती, बुद्ध सर्किट जसं आहे तसं छत्रपती शिवाजी महाराज सर्किट असावं, ही मागणी केली होती, ती मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कालच मान्य केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्लीत स्मारक व्हावं, ही देखील मागणी आहे. दावणगिरी जिल्ह्यातील शहाजी महाराजांच्या समाधीसाठी केंद्र आणि राज्याने निधी उपलब्ध करुन द्यावा. अरबी समुद्रात स्मारकाचे भूमिपूजन झालं, माझी एक मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक दिल्लीत झालंच पाहिजे, मात्र मुंबईत देखील स्मारक व्हावे. राज्यपाल निवासमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावं, अशी अनेकांची मागणी आहे.
उदयनराजे यांनी केलेल्या या मागण्या अमित शाह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या.
Fadnavis approves all of Udayanraje’s demands in the presence of Amit Shah at Raigad!!
महत्वाच्या बातम्या
- Tahawwur Rana : तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर भाजपचा काँग्रेसवर निशाणा, म्हटले…
- याला म्हणतात मोदींची “अंधभक्ती”; बिहारमध्ये काँग्रेसने इच्छुकांना लावले सोशल मीडियाच्या नादी!!
- Mumbai : मोठी बातमी! ११-१२ एप्रिल रोजी मुंबईला जाणाऱ्या तब्बल ३३४ रेल्वे रद्द
- Rajnath Singh : युक्रेन-रशिया संघर्षात ड्रोन ठरताय सर्वात जास्त हानिकारक शस्त्र – राजनाथ सिंह