प्रतिनिधी
मुंबई : तुमचे विमान वेळेवर टेक ऑफ झाले नसते, तर माझे आयुष्याचे विमान कधीच लँड झाले नसते, असे भावपूर्ण उद्गार भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलताना काढले. eknath khadse say thanks to chief minister eknath shinde
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना जळगाव जिल्ह्यात त्यांच्या घरी छातीत दुखू लागल्याने तातडीने त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळताच त्यांनी फोन फिरवून तातडीने आवश्यक ती व्यवस्था केली. याचीच भावनात्मक आठवण एकनाथ खडसे यांनी काढली.
आता एकनाथ खडसे यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांनी हॉस्पिटल मधूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून मदतीबद्दल आभार मानले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने केली व्यवस्था
एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातल्या दरे गावात होते. एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला, याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकनाथ खडसेंसाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्याशी संपर्क केला होता. त्यानंतर तातडीने एअर अँब्युलन्सची व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याबाबत आता एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
आपल्यासाठी छोटाच विषय होता. मला एअर अँब्युलन्स मिळत नव्हती. एक मिळाली ती नाशिकला उभीही होती. मात्र एटीसी क्लिअरन्स मिळत नव्हता. तुम्ही बोलल्यामुळे क्लिअरन्स मिळाला. मी रुग्णालयात आलो. ऑपरेशन थिएटरमध्ये मला नेल्यावर अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला. 2 ब्लॉकेज 100 % आणि तिसरा 70 % होता. परिस्थिती गंभीर होती. पण त्यांनी अँजिओप्लास्टी केली. ती व्यवस्थित पार पडली. माझं हृदय 100 % बंद पडले होते पण डॉक्टरांनी त्यावेळी दोन मिनिटांची शॉक ट्रिटमेंट दिली. तुमचे विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेक ऑफ झाले असते आणि लँड झालेच नसते. तुमचे आभार. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!!, असं एकनाथ खडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोनवर म्हणाले.