• Download App
    Eknath Khadse गुन्हा दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा:; महाजन यांचाही पलटवार

    गुन्हा दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा:; महाजन यांचाही पलटवार

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बोधवड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पूर्वी मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता, पण आता तसं होणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. Eknath Khadse

    या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनी नाव न घेता जामनेरमधील एका बड्या मंत्र्यावर टीका केली. माझ्या राजीनाम्याची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या कारवायांचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी अशोक खरात प्रकरणाचा संदर्भ देत अधिकच खळबळजनक विधान केले. जे खरातकडे गेले असतील, त्यांच्यासोबत रात्र घालवली असेल, त्यांना जाऊन विचारा, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर गंभीर आरोपांचे संकेत दिले.

    खडसे यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख जामनेरकडे असल्याची चर्चा रंगली आहे. मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्ही समजून घ्या, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे गिरीश महाजन यांच्याकडे इशारा केल्याचे मानले जात आहे. या सूचक वक्तव्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



    दरम्यान, जमीन खरेदी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे खडसे यांच्यावर दबाव वाढल्याचे बोलले जात आहे. भुसावळ तालुक्यातील व्यवहारावरून हा गुन्हा दाखल झाला असून त्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून खडसेंवर टीका होत असताना त्यांनी मात्र संघर्षाची भूमिका घेतली आहे. खोट्या गुन्ह्यांना मी घाबरणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

    गिरीश महाजन यांचा पलटवार

    दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर पलटवार केला आहे. आम्ही कोणत्याही भोंदू बुवा-बाबाकडे जात नाही. अशा बाबकडे जाण्याची आम्हाला गरज नाही. कोणालाही हाथ दाखवून भविष्य पाहण्याची मला आवश्यकता नाही. माझा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. असे म्हणत महाजन यांनी खडसे हे बुवा-बाबाकडे जात असल्याचे म्हटले आहे. आमचे सरकार पडणार? असा दावा ते करत असतील तर त्यांना मंत्रीपदासाठी आमच्या शुभेच्छा, असे म्हणत महाजन यांनी खडसे यांना टोला लगावला आहे.

    नाथाभाऊ विरुद्ध गिरीशभाऊ वाद

    एकंदर पाहता, या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यातील नाथाभाऊ विरुद्ध गिरीशभाऊ, हा वाद पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. खडसे आणि महाजन यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे राजकीय संघर्ष अधिकच वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात या प्रकरणावर कोणती राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Eknath Khadse Hits Back After FIR in Mahar Watan Land Case; Targets Mahajan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump’ : द फोकस एक्सप्लेनर : इराण युद्ध, ट्रम्प यांची ‘रेजीम चेंज’ रणनीती आणि जागतिक परिणाम; नेमकं काय घडतंय?

    सुनेत्रा पवारांच्या फोन नंतरही काँग्रेस बारामतीतून लढाईच्या तयारीत!!

    राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर