प्रतिनिधी
ठाणे : महाराष्ट्रात महाविकास सकाळच्या मंत्र्यांवर पडत असलेल्या ईडी आणि अन्य केंद्रीय संस्थांच्या छाप्यांचे “रहस्य” राज ठाकरेंनी ठाण्यातल्या उत्तर सभेत उलगडून दाखवले. महाराष्ट्रात मंत्र्यांवर ईडीचे छापे पडतात आणि प्रत्येक छाप्यानंतर शरद पवार मोदींना भेटतात आणि नंतर कोणाचा नंबर लावायचा ते सांगतात, असे खळबळजनक वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. एकाच घरात राहून अजित पवार यांच्या बहिणींवर छापे पडतात. पण शरद पवार यांच्याकडे पडत नाहीत याचे “रहस्य” काय?, असा खोचक सवाल देखील त्यांनी केला. ईडीच्या छाप्याची जेव्हा नुसती बातमी आली, तेव्हा शरद पवारांनी किती नाटके केली!!, याची आठवण राज ठाकरे यांनी आवर्जून करून दिली. ED raids on ministers in Maharashtra; Raj Thackeray reveals Pawar – Modi’s “secret”
अनिल देशमुख यांच्यावर छापे पडले. त्यानंतर नवाब मलिक यांच्यावर छापे पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संजय राऊत यांच्यासाठी भेटले पण संजय राऊत यांना यातले “रहस्य” माहिती नाही. पवार साहेब खुश झाले म्हणजे समोरच्याला धोका असतो हे राऊतांना कळत नाही, अशा खोचक शब्दात राज ठाकरे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. त्याच वेळी राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे, अशा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. जयंत पाटलांना ते “जंत” पाटील म्हणाले. इतकेच काय तर त्यांची नक्कल देखील राज ठाकरे यांनी केली. आपल्या मतदारसंघाबाहेर ज्यांना कोणी विचारत नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची संभावना केली. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे निवडून येणाऱ्या लोकांची मोळी आहे आणि त्याला बांधायची रस्सी म्हणजे शरद पवार आहेत, असे शरसंधान त्यांनी साधले.
मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात भूमिका कायम
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणाचा ठाण्याच्या उत्तर सभेत विस्तार केला. महाराष्ट्र सर्व संपूर्ण देशातल्या मशिदींवरचे भोंगे उतरावा. यासाठी 3 मेपर्यंत सर्व मुल्ला मौलवींना बोलून समजवा. 3 मे नंतर आम्ही थांबणार नाही. आत्ता फक्त हनुमान चालीसा लावायला सांगितला आहे मला माझ्या भात्याला वेगळा बाण काढायला जाऊ नका,असा इशारा राज ठाकरे यांनी उत्तर सभेत दिला.
आपल्या हिंदुत्वाच्या मुद्याचा अजेंडा राज ठाकरे यांनी आजच्या उत्तर सभेत पुढे सरकवला. शरद पवारांच्या जातीवादाला मनसेचे हिंदुत्व प्रत्युत्तर देईल. महाराष्ट्राला मनसेच जातीपातीच्या बाहेर काढून मराठी अस्मितेचे आणि हिंदू अस्मितेचे प्रत्युत्तर देईल, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अजित पवार, जयंत पाटील या सर्वांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तराचा भर प्रामुख्याने ईडीचे छापे आणि त्यानंतर बदललेल्या भूमिके संदर्भात होता. शरद पवारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सेटिंग करतात, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात मंत्र्यांवर ईडीचे छापे पडले की शरद पवार मोदींची भेट घेतात आणि पुढचा नंबर सांगतात. अनिल देशमुख यांच्यावर छापे पडले. नवाब मलिक यांच्यावर छापे पडले. त्यानंतर शरद पवार संजय राऊत यांच्यासाठी पंतप्रधान मोदींना भेटले. एकाच एकाच घरात राहून फक्त अजित पवार यांच्यावर छापे पडतात आणि शरद पवारांवर छापे पडत नाहीत याचे इंगित काय?, असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीवाद वाढला. जातीचा द्वेष शरद पवारांनी वाढवला, असा आरोप करून राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात देखील महत्त्वाचे विधान केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची ठाकरे – पवार सरकारची इच्छा नाही, हे मी पूर्वी सांगितले होते. लाखा – लाखांचे मोर्चे काढून मराठा समाजाच्या पदरात काही पडले नाही. कारण ठाकरे – पवार सरकारची त्यांना काही देण्याची इच्छाच नव्हती, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यांना फक्त मराठा समाजाच्या तरुण बांधवांची आणि भगिनींची माथी भडकवायची होती आणि मते आपल्या पदरात पाडून घ्यायची होती. यासाठीच त्यांनी मराठा समाजाला भडकवले, असे शरसंधान राज ठाकरे यांनी साधले.
राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे या विषयावर तीन व्हिडिओदेखील दाखवले. त्या प्रत्येक व्हिडिओत त्यांनी भोंग्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका अधोरेखित केली.
3 मे रोजी ईद साजरी होणार आहे. त्यापूर्वी सर्व मुल्ला मौलवींना बोलून त्यांची समजूत काढा आणि मशिदींवरचे भोंगे उतरवा. त्यानंतर आम्ही ऐकणार नाही. आता हनुमान चालीसा लावायला सांगितला आहे. अजून माझ्या भात्यातला वेगळा बाण काढलेला नाही. तो काढायला लावू नका असा इशारा देऊन राज ठाकरे यांनी आपले भाषण संपवले.