विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्यपालांच्या दौऱ्यात पुरोहित संघाने गोदावरी आरती पुन्हा ओढली वादात, इतकेच नाही तर राज्यपालांच्या भाषणात आणि त्यानंतर राष्ट्रगीतामध्ये देखील पुरोहित संघाने आपल्या आरतीचा आवाज वाढवून अडथळा आणला. हा सगळा प्रकार राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नाशिक दौऱ्यात घडला.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने 6 फेब्रुवारी रोजी राष्ट्रजीवन पुरस्कार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण त्यांनी स्वीकारले आणि ते रामतीर्थावर पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यांच्या हस्ते जलतज्ञ महेश शर्मा यांना राष्ट्रजीवन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह सर्व वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते रामतीर्थावर गोदावरी आरती करण्यात आली.
मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाने गोदावरी आरतीचा जुना वाद उकरून काढला. रामतीर्थ गोदावरी सेवा समिती बोगस आहे. त्यांनी चालविलेला आरतीचा उपक्रम डुप्लिकेट आहे, अशा आशयाचे पत्र पुरोहित संघाने राज्यपालांना पाठविले. त्यांनी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या आरतीला उपस्थित राहू नये, तर पुरोहित संघाच्या संघाच्या पारंपारिक गोदावरी आरतीला उपस्थित राहावे, असा आग्रह धरला होता. या संदर्भात पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना मुलाखती देखील दिल्या. परंतु प्रत्यक्षात राज्यपाल सीपी राधाकृष्णन आपल्या नियोजनानुसार आणि पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला आणि आरतीला उपस्थित राहिले होते. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने संबंधित कार्यक्रमाचे निमंत्रण पुरोहित संघाला देखील दिले होते. पुरोहित संघाचे सदस्य असलेले शांताराम भानोसे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
परंतु, पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्यपालांचे भाषण सुरू असताना पुरोहित संघाने तिकडे रामकुंडावरील आरतीचा आवाज वाढवून राज्यपालांच्या भाषणामध्ये अडथळा आणला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब हस्तक्षेप करून पुरोहित संघाला त्यांच्या आरतीचा आवाज कमी करायला लावला. परंतु, काही मिनिटांमध्येच पुरोहित संघाने तो आवाज पुन्हा वाढविला. इतकेच नाही, तर राज्यपालांचे भाषण झाल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रगीत सुरू झाले, त्यावेळी तर सगळे आवाज बंद होणे अपेक्षित असताना पुरोहित संघाने आरतीचा आवाज तसाच वाढवत ठेवला. या सगळ्या प्रकारातून नाशिकमध्ये गोदावरी आरतीसाठीसाठी आलेल्या राज्यपालांचा तर अपमान झालाच, पण त्याचबरोबर राष्ट्रगीता सारख्या सर्वोच्च राष्ट्रीय प्रतीकाचा देखील अपमान झाला. याबद्दल नाशिककरांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावरून यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. आता या संदर्भात नाशिकचे प्रशासन नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करणार??, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
During the Governor’s visit, the Godavari Aarti was again dragged into controversy by the Purohit Sangh
महत्वाच्या बातम्या
- US H-1B visa : अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल अन् संजय सिंह यांची चौकशी करण्यासाठी ACBचे पथक रवाना
- S. Jaishankar: अमेरिकेने १५ वर्षांत किती भारतीयांना मायदेशी पाठवले?
- फडणवीसांनी राहुल गांधींवर केला कव्हर फायरिंगचा आरोप; पण मग केजरीवालांनी काय केलं??