तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी!! चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दीपावली उत्सव सुरू आहे. दिवाळी भारतातच नव्हे, तर विदेशातही जोमाने साजरी केली जाते. यंदा शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. त्या निमित्ताने धनत्रयोदशी आणि या दिवशी येणारी धन्वंतरि जयंती कशी साजरी करावी, हे जाणून घेऊ या. diwali dhantaras special
धनत्रयोदशी (धनतेरस)
आश्विन वद्य त्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे.
व्यापारी देखील आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते.
व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या धनत्रयोदशीच्या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.
साधनेसाठी अनुकूलता आणि ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतात. वर्षभर योग्य मार्गाने धन कमवून वार्षिक उत्पन्नाचा १/६ भाग धर्मकार्यासाठी अर्पण करावा, असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. प्रदोष काळात पूजा सायंकाळी 5.47 वाजेपासून 7.47 पर्यंत करावी. यावेळी यमदीप लावणेही इष्ट ठरेल.
यमदीपदान
या दिवशी यमदीपदानाला विशेष महत्त्व आहे. अकाली मृत्यू कुणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (काही जण तेरा दिवे लावतात) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा.
एरवी दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. फक्त या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील प्रार्थना करावी – ‘धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंड यातून माझी सुटका करावी.’
मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
अर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.
हा श्लोक या वेळी म्हणतात.
धन्वंतरि जयंती
आयुर्वेदाच्या दृष्टीने धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरि जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात.
धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्या हातात ‘जळू’, तिसर्या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरि करतो, अशी श्रद्धा आहे.
कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे प्रसाद म्हणून देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. या दिवशी तोच धन्वंतरि प्रसाद म्हणून देण्यात येतो.
(मराठी विश्वकोषावर आधारित)
diwali dhantaras special
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल यांचा वाहनाला अपघात; तीन जखमी, एकाचा मृत्यू ; जाणून घ्या कसा घडला अपघात?
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रेया बुगडेला पाठवली दिवाळी भेट!
- देशाच्या सीमाभागात नागरिक आणि सुरक्षा व्यवस्थेत सामंजस्य वाढविणार संघ स्वयंसेवक!!; मोदी सरकारच्या भक्कम संरक्षण धोरणाला पूरक भूमिका!!
- उत्तर प्रदेश : अलिगडचे नाव बदलणार! हरिगड ठेवण्याची तयारी सुरू, महापालिकेत प्रस्ताव मंजूर