नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर भाजप + शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतल्या अनेक इच्छुकांची निराशा झाली हे खरे, पण त्यातून नाराज झालेल्यांची जितकी जास्त बडबड, तितके त्यांचे राजकीय भवितव्य धूसर!!, हे मात्र त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. displeasure will not be accepted beyond limits
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाची यादी तयार करताना आणि ती भाजप श्रेष्ठींकडून मंजूर करून घेताना जो काही विचार विनिमय केला असेल, त्यातूनच अंतिम 39 नावे फायनल झाली आणि त्या सगळ्यांना नागपूरमध्ये मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात बरेच नवे चेहरे आले, याचे कारण एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले 12 जुने चेहरे वगळले. ते चेहरे वगळले नसते, तर फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा चेहरा – मोहरा बदललेला दिसला नसता. नव्या नेत्यांना संधी देता आली नसती, हा मुद्दा लक्षात घेतला, तर नाराजांची नाराजी स्वाभाविक मानली, तरी ती नव्या राजकीय संदर्भात गैरलागू आहे, हे स्पष्ट दिसते.
छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, विजय शिवतारे, तानाजी सावंत, रवी राणा, सदाभाऊ खोत, संजय कुटे, आदी नेते नाराज झाले.
खरं म्हणजे नाराजांची यादी महायुतीतल्या दोन घटक पक्षांमुळे मोठी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे नाराजांच्या यादीचे शेपूट वाढले.
मंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा मक्ता आहे. “सत्ता” हा राष्ट्रवादी काँग्रेसचा “डीएनए” आहे, हा गैरसमज महाराष्ट्रात माध्यमांनी एवढा घट्ट रुजवून ठेवला, की तो शरद पवार हे “चाणक्य” असल्याच्या समजासारखा सगळ्या लोकांना खरा वाटायला लागला!! वास्तविक सत्ता कुठल्याही पक्षाचा “डीएनए” असूच शकत नाही. याचा अर्थ सत्ता ही कुठल्या पक्षाची मक्तेदारी असू शकत नाही. जनतेने ज्याला सत्तेवर बसवले, त्याने सत्तेवर बसायचे आणि ज्याला विरोधात बसवले त्याने विरोधात बसायचे हा खरं म्हणजे लोकशाहीचा “डीएनए” आहे. तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीने कायमच पायदळी तुडवला आहे. महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही येवो आमचे मंत्री तिथे घुसलेच पाहिजेत, हा त्यांचा समज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सत्ताधारी घटकांनी कायम ठेवल्याचा तो दुष्परिणाम आहे. त्याला मोदी + शाह + फडणवीसांचा भाजपही अपवाद नाही.
म्हणून छगन भुजबळांची नाराजी सगळ्यात मोठी दिसली. जणू काही भुजबळांना मंत्री केले नाही म्हणून ओबीसी सगळ्या समाज घटक नाराज होईल, हा समज भुजबळ समर्थकांनी पसरवला. पण वस्तुस्थिती तशी नव्हती, याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांनी मंडळाच्या आवारात घेतलेल्या पत्रकार परिषदेत करून दिली. ओबीसी समाजासाठी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने घेतलेल्या 48 निर्णयांची यादीच फडणवीस यांनी वाचून दाखवली.
पण त्यापलीकडे जाऊन मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेले जे नाराज सध्या वेगवेगळ्या ठिकाणी बडबड करत आहेत, त्या नाराजीची “दखल” मुंबई + नागपूर आणि दिल्लीत जरूर घेतली जात आहे. किंबहुना ती नाराजी टिपण्यासाठी या तिन्ही शहरांमधले माध्यमांच्या पलीकडले “कॅमेरे” ती “अचूक टिपण्याचे” काम करत आहेत, हा मुद्दा सर्वाधिक कळीचा आहे.
मूळात फडणवीस + शिंदे आणि अजित दादांनी जरी मंत्रिमंडळाची यादी तयार केली असली तरी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब मोदी + शहा यांनी केले असल्यामुळे जो काही निर्णय व्हायचा तो दिल्लीत होतो, हे नाराजांनी नीट लक्षात घेतले पाहिजे आणि दिल्लीला असली कुठलीही “नाराजी” सहन होत नाही किंवा दिल्ली कुठलीही “नाराजी” सहन करत नाही हे आजच्या नाराजांनी लक्षात घेतले पाहिजे.
बावनकुळे यांचे आदर्श उदाहरण
यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचे उत्तम उदाहरण डोळ्यासमोर ठेवले, तरी नाराजांची नाराजी व्यक्त करण्याची पद्धत लगेच बदलून जाईल. 2019 मध्ये बावनकुळे यांचे तिकीट कापले. त्यांना विदर्भाच्या भागापुरते प्रचार प्रमुख केले. त्यांनी भाजप श्रेष्ठींचा निर्णय मान्य करून त्यांना अपेक्षित असलेले सगळे काम केले. दोनच वर्षात चित्र बदलले. भाजपा श्रेष्ठींनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले. मंत्रिमंडळ विस्तारात चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्थान पहिली राहिले. याचा अर्थ मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यानंतर बावनकुळे यांचे स्थान आले. बावनकुळे 2019 मध्ये काही “बोलले” नाहीत, त्यांनी काम करून दाखवले, त्याचा हा परिणाम 2024 च्या मंत्रिमंडळ विस्तारात दिसला. हा महत्त्वाचा मुद्दा जरी आजच्या नाराजांनी लक्षात घेतला, तरी त्यांना यातून फार मोठा धडा शिकता येईल. नाराजांची जितकी जास्त बडबड, तितके त्यांचे भवितव्य धुसर!! हा मंत्र नाराजांसाठी इशाऱ्याचे काम करतो आहे, त्याकडे त्यांनी आवश्य लक्ष द्यावे!!
displeasure will not be accepted beyond limits
महत्वाच्या बातम्या
- Mani Shankar Aiyar मणिशंकर अय्यर म्हणाले- गांधी परिवाराने माझे करिअर उद्ध्वस्त केले, सोनिया-राहुल 10 वर्षांत एकदा भेटले
- Omar Abdullah: ओमर अब्दुल्लांनी काँग्रेसचे उपटले कान, म्हणाले- EVMवर रडणे थांबवा, विश्वास नसेल तर निवडणूक लढवू नका!
- Ustad Zakir Hussainतबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन; 2023 मध्ये पद्मविभूषणने सन्मान
- Danish Merchant : मुंबई पोलिसांनी दाऊदचा साथीदार डॅनिश मर्चटला अटक