विशेष प्रतिनिधी
पुणे : शरदनिष्ठ की अजितनिष्ठ या वादात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असली तरी पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची राजकीय कोंडी झाली असून जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आपली “तटस्थ” भूमिका असल्याचे जाहीर केले, तर अजित दादांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेऊनही दिलीप वळसे पाटलांनी सौम्य भूमिका घेत कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या मेळाव्यालाही जाण्याचे आदेश काढले. Dilemma of NCP MLAs in Pune District
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ की अजित निष्ठा असा पेचप्रसंग तयार झाल्यानंतर अनेक आमदारांनी अजित पवारांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. पण पुणे जिल्ह्यात मात्र नेमकी कोणाची बाजू घ्यायची??, या धास्तीने आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आणि ही अस्वस्थताच आज अतुल बेनके यांच्या वक्तव्यातून समोर आली.
अतुल बेनके जुन्नरचे तरुण आमदार आहेत. त्यांनी सुरुवातीला अजित पवार कॅम्पमध्ये जाऊन त्यांच्या पत्रावर सही देखील केली. पण जुन्नर मध्ये येऊन प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर त्यांनी आपली भूमिका “तटस्थ” असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे देखील जाहीर करून टाकले.
दुसरीकडे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या समर्थकांचा मंचर मध्ये मेळावा घेऊन संघर्षाची भूमिका टाळली. शरद पवार जर आपल्या मतदारसंघात मेळावा घेणार असतील तर कार्यकर्त्यांनी त्या मेळाव्याला देखील जरूर जावे. कारण आपले भांडण शरद पवारांशी नाही. आपल्याला तालुक्याचा विकास करायचा असल्याने आणि उर्वरित कामे पूर्ण करायची असल्याने आपण अजितदादांबरोबर सत्तेच्या बाजूने गेलो. अन्यथा आपल्याला सत्तेचा मोह नाही, असे वक्तव्य दिलीप वळसे पाटलांनी केले. दिलीप वळसे पाटलांच्या या सौम्य भूमिकेमागे देखील पुणे जिल्ह्यातले आमदारांची कोंडी झाल्याचे दिसले.
एकतर पुणे जिल्हा हा शरद पवारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातही पुणे जिल्हा आपल्या हातातून निसटू नये म्हणून पवार बारकाईने लक्ष घालून तिकिटे वाटतात. इतकेच नाही तर पुणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या छोट्यातल्या छोट्या राजकीय कारवायांवर पवारांचे स्वतःचे लक्ष असते.
या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातल्या आमदारांची पवारांच्या घरातल्या भांडणात राजकीय कोंडी झाली आहे आणि ही कोंडी या आमदारांना “स्वबळावर” सोडवता येत नाही, हीच त्यांची मुख्य अडचण आहे. त्यामुळेच अतुल बेनके यांच्यासारख्या तरुण आमदाराने “तटस्थ” भूमिका घेऊन 2024 ची निवडणूक आपण लढवणार नाही, असे जाहीर केले तर दिलीप वळसे पाटलांनी देखील अजित दादांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेऊन देखील शरद पवारांशी आपले भांडण नाही, असे सांगून सौम्य भूमिका घेतली. कारण पवारांच्या पुणे जिल्ह्यातील या दोन्ही आमदारांना दुसरा पर्यायच नव्हता.
Dilemma of NCP MLAs in Pune District
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमधील भूमिहीनांना जमीन देण्याच्या निर्णयाला विरोध, खोऱ्यातील नेत्यांना वाटतेय ही भीती
- WATCH : आता भगव्या रंगात दिसणार नवी वंदे भारत एक्स्प्रेस, रेल्वेमंत्री म्हणाले- तिरंग्यापासून घेतली प्रेरणा
- भारतात समान नागरी संहिता केवळ तत्त्वतःच शक्य, जावेद अख्तर यांचे मत
- गडचिरोली दौऱ्यावरून परतताना मुख्यमंत्री शिंदेंना दिसली रस्त्यावर बंद पडलेली रुग्णवाहिका, त्यानंतर…