विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा “ऍक्टिव्ह: झाले. त्यांनी धनंजय मुंडे यांना भेटायला मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलवले. दोघांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी बाहेर येऊन आपण कुणाकुणाची तोंडे धरणार??, असा सवाल केला, पण या सगळ्या प्रकरणावर अजित पवार मात्र अद्याप मौन धारण करून आहेत.
बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणांमध्ये राजकीय आणि सामाजिक संताप उसळल्यानंतर ते प्रकरण थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत येऊन पोहोचले. अजित पवार हे धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांना का पाठीशी घालतात??, असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासकट सर्वपक्षीय आमदारांनी विचारला. धनंजय मुंडे + वाल्मीक कराड आणि शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीचे सगळे संबंध यानिमित्ताने उघड्यावर आले. पवारांनी निर्माण केलेली राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती संशयाच्या घेऱ्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर चौकटीत राहून या संदर्भात सर्व कारवाई केली. संतोष देशमुख प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी नेमली. चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. परंतु धनंजय मुंडे + वाल्मीक कराड + अजित पवार यांच्या भोवतीचे संशयाचे वातावरण गडदच होत राहिले. त्याला मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय संघर्षाची किनार मिळाली.
पण धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर देखील अजितदादांनी अद्याप तरी या प्रकरणात मौनच बाळगले आहे.