विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Devendra Fadnavis राष्ट्रवादीच्या विलीनकरण संदर्भात त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याविषयी माझा बोलण्याचा काहीही संबंध नाही. त्यांचा पक्षांतर्गत निर्णय झाल्यानंतर ते महायुतीकडे तसा प्रस्ताव घेऊन येतील. त्यानंतर मात्र, नक्कीच याविषयी बोलणे योग्य ठरेल. मात्र, तोपर्यंत हवेत पतंगबाजी का करायची? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.CM Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त दिल्लीवारीचे वृत्त आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर चर्चा सुरू झाली आहे. यावर फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली.CM Devendra Fadnavis
फडणवीस स्पष्टच म्हणाले…
अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या चर्चेने पुन्हा जोर धरला. विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले गेले. स्वतः शरद पवार यांनीही हीच भूमिका मांडली. तसेच विलीनीकरणाची तारीखही निश्चित झाली होती, अशी माहिती त्यांनी दिली होती. आता सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ‘त्याविषयी माझा बोलण्याचा काहीही संबंध नाही. त्यांचा पक्षांतर्गत निर्णय झाल्यानंतर ते महायुतीकडे तसा प्रस्ताव घेऊन येतील. त्यानंतर मात्र, नक्कीच याविषयी बोलणे योग्य ठरेल. मात्र, तोपर्यंत हवेत पतंगबाजी का करायची?’, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शब्द सुमनांनी स्वागत केले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक होती. तर उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची देखील ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती. मात्र, दुखवट्यामुळे केवळ शब्दसुमनांनी आम्ही सुनेत्रा पवार यांचे स्वागत केले. अजित पवार यांच्या स्वप्नांना पूर्ण करत त्यांच्या प्रमाणेच सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून कामे होतील, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवारांना श्रद्धांजली
सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज सुनेत्रा पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी संयमाने जबाबदारी स्वीकारली आहे. म्हणूनच, आज आम्ही त्यांचे स्वागत केले. मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्ष आणखी मोठे यश मिळवेल. त्यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाच्या निर्णय प्रक्रियेवर चर्चा करणे योग्य नाही. त्या स्वतः तो निर्णय घेतील. आज मंत्रिमंडळाने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि शोक प्रस्ताव मंजूर केला.
राजकारणाची कल्पना नाही
चंद्रपूर मध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला असल्याची माहिती मला आत्ताच मिळाली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मात्र त्या मागील राजकारणाची सध्या आपल्याला काहीही कल्पना नसल्याचं ते म्हणाले. यासंबंधी माहिती घेऊन मी बोलेल. भाजपच्या महापौर झाल्यामुळे त्यांचे माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. भाजपचा महापौर झाल्याचा आपल्याला देखील आनंद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
पवारांनीही मांडली होती भूमिका
दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले होते की, ‘ राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची अजित पवारांचीही इच्छा होती. ती नक्कीच पूर्ण व्हायला हवी. अजित, शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांनी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू केली होती. विलीनीकरणाची तारीखही निश्चित झाली होती. 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा होणार होती, पण दुर्दैवाने, अजित त्याआधीच आम्हाला सोडून गेले.’ शरद पवारांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) नेते प्रमोद हिंदुराव म्हणाले होते की, ‘ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांच्याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही, पण मला वाटते की येत्या काळात सर्व पक्ष एकत्र काम करतील.’
NCP विलीनीकरणाबाबत 3 लोकांचे दावे
1. अजितचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी न्यूज एजन्सी PTI ला सांगितले की, ते दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी 100% उत्सुक होते. त्यांनी पाच दिवसांपूर्वी सांगितले होते की, प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि पुढील काही दिवसांत विलीनीकरण होणार आहे. गुजर म्हणाले की, अजित यांच्याकडे विलीनीकरण आणि एकसंध NCP च्या भविष्यासाठी एक रोडमॅप तयार होता.
2. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही सांगितले आहे की, विलीनीकरणासंदर्भात अजितदादा आणि त्यांच्यात अनेक बैठका झाल्या होत्या. अजितदादा यावर सकारात्मक होते. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर यावर अंतिम निर्णय होणार होता. अजितदादा म्हणाले होते की, आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती करून लढवाव्यात, विलीनीकरणाचा निर्णय निवडणुकीनंतर घेऊ.
3. राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील. विलीनीकरण निश्चित झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले तर काय होईल…
राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) च्या सूत्रांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, बुधवारी झालेल्या विमान अपघातापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट चर्चेच्या प्रगत टप्प्यावर पोहोचले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका संपल्यानंतर लगेचच विलीनीकरणाची घोषणा करण्याची योजना होती.
अजितदादांची रणनीती अशी होती की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि पूर्णपणे विलीनीकरणाची घोषणा करण्यापूर्वी दोन्ही पक्षांच्या मतपेढीला मजबूत करावे.
सूत्रांचे म्हणणे आहे की विलीनीकरणामुळे मंत्रिमंडळाच्या गणितात मूलभूत बदल होईल. जर विलीनीकरण झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते राज्याच्या कारभारात आणि पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावतील.
हे विलीनीकरण पश्चिम महाराष्ट्रातील ‘शुगर बाऊल’वर पुन्हा ताबा मिळवण्याची रणनीती म्हणून पाहिले जात आहे, जिथे भाजपने अलीकडील महानगरपालिका निवडणुकांमध्ये महत्त्वाची पकड मिळवली आहे.
विलीनीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 9 लोकसभा खासदार आणि 51 आमदारांचे एक मजबूत संयोजन असेल, जे संभाव्यतः सत्ताधारी महायुती आघाडी किंवा विरोधी महाविकास आघाडी (MVA) मधील संतुलन बदलू शकते.
NCP Merger with BJP? CM Devendra Fadnavis Calls it ‘Internal Matter’
महत्वाच्या बातम्या
- धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे कल्याण; णमोकार तीर्थक्षेत्री पंचकल्याणक प्रतिष्ठा सोहळ्यात सरसंघचालकांचे प्रतिपादन
- Cyber Fraud : सुप्रीम कोर्टाने ₹54000 कोटींच्या सायबर फसवणुकीला दरोडा-लूट म्हटले; ही रक्कम अनेक राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही जास्त
- जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड कडून 15000 कोटींच्या कर्जासह फडणवीस सरकारचे अनेक महत्त्वाचे निर्णय
- Manipur Violence : मणिपूरच्या लितानमध्ये हिंसाचार उसळला, 25 घरे जाळली; दंगलखोरांनी रायफलींनी गोळीबारही केला